धोनीच्या याचिकेमुळे आयपीएस अधिकाऱ्याला तुरुंगवास

| चेन्नई | वृत्तसंस्था |

मद्रास उच्च न्यायालयानं भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी जी. संपत कुमार यांना शुक्रवारी 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ही याचिका दाखल केली गेली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं कुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं कुमार यांना 30 दिवसांचा अवधी दिला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचा अवमान करणारी विधानं केल्यामुळे धोनीनं आयपीएस अधिकाऱ्याविरोधात याचिका दाखल केली होती. सट्टेबाजांमध्ये आपलं नाव घेतल्याप्रकरणी धोनीनं 2014 मध्ये अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानं 100 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती.

संपत कुमार यांना न्यायालयाविरोधात केलेल्या विधानांमुळे त्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी धोनीनं याचिकेच्या मार्फत केली होती. संपत यांनी जाणूनबुजून न्यायालयाचा अपमान करण्याचा आणि त्यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं खंडपीठानं म्हटलं. न्यायमूर्ती एस.एस. सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठानं संपत कुमार यांना शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे.

Exit mobile version