| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बीसीसीआय लवकरच आयपीएल 2024 दरम्यान भारतीय संघाची घोषणा करू शकते. यादरम्यान भारताचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठाणने आगामी टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि केएल राहुल यांना इरफान पठाणने त्याच्या 20 वर्ल्ड कप संघात समाविष्ट केले नाही.
सलामीवीर म्हणून इरफान पठाणने आपल्या संघात कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जैस्वालची निवड केली आहे. तो म्हणाला की, यशस्वी जैस्वाल आयपीएलपूर्वीही भारतीय संघासाठी कामगिरी करत होता आणि त्यामुळेच त्याची निवड आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवले आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंतची निवड केली आहे.
याशिवाय इरफानने रिंकू सिंगची निवड केली आहे. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांची अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. या सोबत त्याने आपल्या संघात तीन फिरकीपटूंची निवड केली आहे. रवींद्र जडेजा व्यतिरिक्त त्याने युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची निवड केली आहे. चहल आणि कुलदीप या दोघांनीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इरफान पठाणने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली आहे. तर शुभमन गिलचीही बॅकअप सलामीवीर म्हणून निवड झाली आहे.