एसटीच्या काचांवर लोखंडी जाळ्या

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
एसटीवर होणार्‍या दगडफेकसारख्या घटनांपासून चालक वाहकाचे संरक्षण व्हावे, यासाठी एस टी च्या काचांवर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे.यानंतर सावंतवाडी आगारातून कालिका मंदिर, शिवापूर, शिरोडा, आंबेगाव, दोडामार्ग या फेर्या सुरू करण्यात आल्या. यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
याशिवाय, नोटीस बजावल्यानंतर सोमवारी एक चालक हजर झाले असून, जसे वाहक चालक हजर होतील त्यानुसार बस फेर्‍या वाढवण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.
राज्यभरात एसटी महामंडळाच्या कामगारांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे गेले दोन महिने हे काम बंद आंदोलन सुरूच आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे मात्र शासनाकडून मागणीबाबत अद्यापही निर्णय घेतला नाही. यामुळे महामंडळाकडून कामावर हजर न होणार्‍या कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत येथील आगारातील 257 कामगारांना अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
यानुसार 337 कामगारांपैकी 21 कामगार हे कामावर हजर झाले आहेत यात 4 ड्रायव्हर व 10 वाहक यांचा समावेश आहे यातील दोन ड्रायव्हर हे दोडामार्ग येथून सावंतवाडी येथे दाखल झाले आहेत. तर मालवण येथे तीन आणि कणकवली येथे एक वाहक पाठवण्यात आला आहे. या हजर कामगारांच्या सहकार्याने शिरोडा दोडामार्ग या फेर्‍या सुरू करण्यात आल्या.
मात्र दुसर्‍या दिवशी दोडामार्ग शिरोडा या दोन्ही बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली त्यात बसच्या काचा चे नुकसान झाले मात्र सुदैवाने यात चालक व प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही याबाबत पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Exit mobile version