। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड परिसरात शुक्रवारी (दि.2 ) सकाळी आठच्या सुमारास मोठा अपघात होता होता टळला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गाच्या संरक्षण कठड्याला धडकून पुन्हा मुंबईच्या दिशेने वळला. आज शासकीय सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक कुटूंबासह पर्यटनासाठी आले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली.
या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर लोखंडी पाईप तसेच संरक्षणासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पत्रे होते. ट्रकचा तोल गेल्यानंतर हे साहित्य संरक्षण पत्रे तोडून खाली कोसळले. त्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्याकडून महामार्गावर येणाऱ्या भुयारी मार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोखंडी पाईप रस्त्यावर पडले. लोखंडी साहित्य रस्त्यावर विखुरल्याने या भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने अपघाताच्या वेळी या ठिकाणी कोणतेही वाहन अथवा नागरिक लोखंडी पाईपच्या थेट आघातात आले नाहीत. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, या भुयारी मार्गाच्या परिसरात अनेक रिक्षाचालक आपली वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताच्या वेळी रिक्षा किंवा प्रवासी तेथे असते तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेमुळे भुयारी मार्ग परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लोखंडी पाईप आणि इतर साहित्य हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, महामार्गावर अशा प्रकारे अवजड वाहनांचे नियंत्रण सुटणे आणि साहित्य रस्त्यावर कोसळणे ही बाब वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या परिसरात रिक्षा उभ्या करण्यासह अवजड वाहनांच्या हालचालींवरही संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे. कर्नाळा खिंड आणि भुयारी मार्ग परिसरात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून होत आहे.
कर्नाळा खिंडीत ट्रकमधून कोसळले लोखंडी पाईप
