सीसीटीव्ही फुटेजमध्ये गँग उघड; पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक सुरू
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील जासई ते जेएनपीटी मार्गावर सराईत टोळीने थेट हायड्राचा वापर करून तब्बल 22 लाख 50 हजार किमतीचे लोखंडी पाइप चोरल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. 9 सप्टेंबर रोजी ही चोरी घडली असून, परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. परंतु, सदरचा हायड्रा व ट्रेलर जप्त करण्यात आला नसल्याचे समजते.
याप्रकरणी मुख्य आरोपी विक्रम तुपसाखरे (28) आणि अहेसानुल्ला शेख यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. दोघेही फरार असून, पोलिसांचा श्वास रोखणारा पाठलाग सुरू आहे. पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्यातील माल वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीस काढल्याचे उघड झाले आहे. अहेसान शेख याने चोरीचा माल तब्बल तीन ठिकाणी विकला. त्यातून नऊ पाइप वेगवेगळ्या खरेदीदारांकडून जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेच्या कारवाईतून बखतावर खुलारी आणि अमीरउल्ला चौधरी यांच्या ताब्यातून अर्धे पाइप तुकडे आणि तब्बल 7.5 लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र, ही मंडळीदेखील फरार आहेत. चोरीतील मालाची किंमत व रोख रकमेची उलाढाल मिळून तब्बल 22 लाख 50 हजारांपर्यंत पोहोचत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील तौसीब, अमीरउल्ला, तौफिक खान आणि पुष्पराज कदम यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या सर्वांचा चोरीतील माल विक्री व पैशांच्या व्यवहाराशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
या गुन्ह्याचा तपास डीसीपी अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांनी सर्वतोपरी मोहीम उघडली असून, सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे लोखंडी गँगला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
