| संगमेश्वर | प्रतिनिधी |
शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याचे वितरण वेळेत होत नसल्यामुळे तालुक्यातील काही प्राथमिक शाळांच्या व्यवस्थापन समित्या तसेच संगमेश्वर तालुका शिक्षण संस्थाचालक संघटना उपोषण करण्याच्या तयारीत आहे.
शाळा सुरू होऊन आता एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी संपत आला तरीही अद्याप शाळांना मिळणारा पोषण आहार मिळालेला नाही. त्यामुळे आता पोषण आहार कुठला शिजवायचा आणि कुठून आणून द्यायचा, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे. पोषण आहार वेळेत मिळत नसल्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळातील व्यवस्थापन समित्या, माता पालकसंघामधून गेले महिनाभर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोषण आहाराचे धान्य, साहित्य फेब्रुवारी महिन्यांपासून मिळालेले नसल्याने अजून किती दिवस उसनवारी करायची, असा प्रश्न केला जात आहे.
तसेच, इतर धान्यांकरिता, साहित्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा, याचीही चिंता शाळा व्यवस्थापनासमोर उभी ठाकली आहे. विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हावेत, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना आणली; मात्र संगमेश्वर तालुक्यासह अन्य तालुक्यांत पोषण आहाराचा तुटवडा आहे. पोषण आहार वितरणात सातत्याने अनियमितपणा येत असल्याने ठेकेदाराचा ठेकाच रद्द करावा, अशीही मागणी जोर धरत आहे.