ढेकाळे फिडरचा वीज पुरवठा अनियमित

xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

पावसामुळे महावितरण कंपनीचे दावे फोल

| पालघर | प्रतिनिधी |

वीज वितरण वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मरची मान्सून पूर्व दुरुस्तीची कामे वेळेत करूनही पावसाळ्यात ढेकाळे फिडरवरील वीज पुरवठा अनियमित होत असल्याने ग्रामीण भागातील गावे अंधारात असून अनेक गैरसोयींचा समावेश करावा लागत आहे. यात 22 गावे आणि शेकडो वाड्यांचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेसपासून ढेकाळे ते दहिसरपर्यंतची 22 गावे आणि शंभर पाड्यांमधील ग्राहकांना सावरखंड उपकेंद्रा अंतर्गतच्या ढेकाळे फिडरमार्फत वीजपुरवठा केला जातो. सावरे-एम्बुर, पाचूधारा, सुलशेत, बहिरींफोंडा आणि जायशेतसारख्या दुर्गम भागाला वीजपुरवठा ढेकाळे फिडरवरून केला जात आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून महामार्गावरील ढेकाळे फिडरचा वीजपुरवठा अनियमित झाला आहे. वाऱ्याची झुळूक आणि पावसाचा शिडकावा ढेकाळे फिडरवरील वीजपुरवठा खंडित होण्यास कारण ठरत असते. उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांमधील बिघाडामुळे गेल्या आठवड्यात दोन रात्री आणि तीन दिवस ढेकाळे फिडरचा वीजपुरवठा खंडित होता. शुक्रवारी रात्री सुरू झालेला वारा आणि पावसामुळे ढेकाळे फिडरला वीजपुरवठा करणाऱ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडमुळे पुन्हा विजपुरवठा खंडित होत आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पूर्व कामांसाठी महावितरण कंपनीकडून मोठा ब्रेक डाउन घेतला जातो. दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करून पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची आश्वासने दिली जातात. परंतु, पावसाने महावितरण कंपनीचे दावे फोल ठरवले आहेत. ढेकाळे फिडरचा वीजपुरवठा पावसाळ्यात सर्वाधिक वेळा प्रभावित होत असतो. पन्नास ते साठ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या, आठ ते दहा टॅब लाईन असल्याने एका टॅब लाइन वर बिघाड झाल्यास संपूर्ण फिडरवरील वीजपुरवठा खंडित होतो. बिघाड झालेल्या ठिकाणाचा शोध घेऊन दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जातो.

Exit mobile version