पनवेल-केळवणे मार्गावर एसटीची अनियमितता

| चिरनेर | वार्ताहर |

पनवेल आगारातून सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुटणारी केळवणे एसटी बस कित्येक दिवसांपासून, वेळेवर लागत नसल्यामुळे, विद्यार्थ्यांसह महिला आणि नोकरदार प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. एसटी प्रशासनाकडून डेपोत गाड्या कमी असल्याचे कारण सांगितले जात आहे . तसेच आगारात कर्मचारी वर्गही कमी असल्याची वस्तुस्थिती सांगितली जात आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रवासी वर्गाकडून पनवेल एसटी प्रशासनाला कमी करण्यात आलेल्या एसटीच्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, अशा प्रकारची निवेदने देखील दिली आहेत.

मात्र या प्रश्नावर एसटी प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. आवरे ते पनवेल या मार्गावरून केळवणे पिरकोन, मोठीजुई या बसेस धावत होत्या. मात्र कोरोना काळापासून या सर्व बसेस कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी आणि नोकरदार वर्गाला प्रवास करण्यासाठी या एसटी बसेसचा उपयोग होत होता. मात्र या बसेस उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. महिलांना आता 50 टक्के सवलतीच्या दराने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र एसटीच्या बसेस उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने महिलांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथील महिला वर्गाला नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा अधिक अंत न पाहता एसटी प्रशासनाने कमी केलेल्या एसटीच्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी येथील प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

Exit mobile version