कामाच्या वेळेत डॉक्टर झोपले; रुग्णांवर ताटकळत राहण्याची वेळ
| छ. संभाजीनगर | प्रतिनिधी |
छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलेला डॉक्टर झोपले असल्याने ताटकळत उभा रहावे लागले. कामाच्या वेळेत डॉक्टर टेबलवर डोके ठेवून झोपले होते. आता या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आरोग्य सेवेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ विभागातील वॉर्ड नंबर पाचमध्ये ही घटना घडली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिलेची सोनोग्राफी करायची होती. मात्र, डॉक्टर झोपले असल्याने सोनोग्राफी करण्यास नकार दिला गेला. तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ महिला रुग्णालयात सोनोग्राफीसाठी प्रतीक्षा करत उभा होती. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. महिलेला तीव्र वेदना होत असल्याने ती सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णालयात आली होती. परंतु तिथं असणाऱ्या नर्सने डॉक्टर झोपले आहेत, ते संध्याकाळी जेव्हा उठतील तेव्हा सोनोग्राफी होईल. तोवर मी तुम्हाला काही गोळ्या देते असे सांगितले. रुग्णालयातील या प्रकाराचा व्हिडिओ एका रुग्णाच्या नातेवाइकाने काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय हे मराठवाड्यातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठा आधार आहे. मात्र, लाखो रुपये पगार घेणाऱ्या डॉक्टरांकडून असा बेजबाबदारपणा केला जात आहे. रुग्णांना ताटकळत उभा ठेवले जात असल्याच्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही तासन्तास वाट पाहतो, परंतु डॉक्टर झोपलेले असतात, मग आम्ही कुठे जायचे? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.







