इर्शाळगड दुर्घटना अपडेट: 10 जणांचा मृत्यू; 100 पेक्षा अधिक लोक अडकल्याची भीती

इर्शाळवाडी ही अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेली असल्याने बचावकार्यात अडथळे

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात ईर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर डोंगराची दरड कोसळली असून, मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

इर्शाळवाडीत एकूण 48 घरं असून त्यातल्या 18 घरांवर दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या 227 च्या आसपास आहे. त्यातील 80 जणं सुखरुप असल्याचं समोर आलं आहे. तर 10 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. उर्वरित 100 जणं या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या दुर्घटनेत 21 जणं जखमी झाल्याची माहितीही देण्यात आलीय.

मदतकार्यात मोठ्या अडचणी
इर्शाळवाडी ही अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेली आहे. गडाच्या पायथ्यापासून या वाडीत पोहचण्यासाठी दीड ते दोन तासं लागतात. त्यायामुळं या ठिकाणी मदतकार्य करणं अत्यंत अवघड आहे. एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाली असली तरी जेसीबी, हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहचणं अशक्य आहे. या परिसरात पाऊसही मोठ्या प्रमाणात कोसळतो आहे. त्यामुळं मदतकार्य अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे. जेसीबी एयरलिफ्ट करता येईल का, याचेही प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र हेलिकॉप्टरही पोहचू शकत नसलेल्या या भागात कसं पोहचणार, असा प्रश्न आहे.

मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री घटनास्थळी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच या ठिकाणी दाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनात बचाव कार्य सुरु आहे. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन रात्री 3 वाजता दुर्घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मदत कार्य सुरु करण्यात आले. पहाटेपासून मदतकार्य जोरात सुरु आहे. ट्रेकर्स, स्थानिक तरुण यांच्या मदतीनं हे बचाव कार्य करण्यात येतंय. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, अनिल पाटील, अदिती तटकरे, दादा भुसे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ठाकरे गटाचे अंबादास दानवे हेही घटनास्थळी दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे वॉर रुममधून या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. तसचं प्रशासकीय हालचालींवर आणि मदतकार्यावर नजर ठेऊन आहेत.

Exit mobile version