इर्शाळवाडी येतेय पूर्वपदावर..

एक महिन्यानंतरही दुःख कायम

| रसायनी | वार्ताहर |

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मूलभूत गरजा, सुविधा पुरविण्यास सरकार कमी पडले नाही हे सत्य असले तरी दुःख पचविणे तेवढे सोपे नाही. एक महिन्यानंतर इर्शाळवाडीच्या पुनर्वसन ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता, अनेकांनी आपल्या आठवणी जाग्या करून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. कुणीही मदत कमी पडली असा उच्चारदेखील केला नाही.

इर्शाळवाडी दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या ग्रामस्थांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंत, जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर ताप्तुरत्या कंटेनर हाऊस येथे सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 144 आपद्ग्र्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. सध्या दिलेल्या सुविधा आणि पुनर्वसन कामात आम्ही समाधानी असल्याचे आपल्या कुटुंबातील पाच जणांना गमावलेले ज्येष्ठ नागरिक कमळू पारधी यांनी सांगितले. अंतर्गत रस्ते, पाण्याचे नळ, शौचालये, घरांची आतील सुविधा, रोजचे जेवण, नाश्ता, सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास्ट दिवे, फिल्टर पाणी, अंगणवाडी, गुरांचा गोठा, शासकीय दवाखाना, पोलीस आणि खासगी पहारा, मोबाईल फोन, गॅस शेगडी, सिलिंडर, बिछाना कसली कमतरता नाही, अशा चांगल्या परिस्थितीत दुर्घटनाग्रस्त राहात आहेत. तरीही दुःख तसूभर कमी झाले नाही. अनेकजण आजही कुणी आपला नातू, कुणी आपला मुलगा, तर कुणी मुलगी, कुणी आपला मोठा भाऊ, लहान भाऊ, कुणी आईवडील गमावल्याचे दुःख पचवू शकले नाहीत.

Exit mobile version