यष्टीरक्षकाच्या जागेसाठी तगडी स्पर्धा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघासाठी अगामी आशिया चषक खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील वर्षी खेळविला जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आशिया चषक देखील टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असून, 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतचे स्थान कायम राहील का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सध्या 3 यष्टीरक्षक फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली आहे, जे पंतची जागा खेचून घेण्याची ताकद ठेवतात.
भारतीय संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन अनेक वेळा पंतच्या उपस्थितीमुळे संघात ये-जा करत राहिला. मात्र, यावेळी त्याची कामगिरी बोलकी आहे. आयपीएलमध्ये झगमगणाऱ्या सॅमसनकडे ओपनिंगपासून मिडल ऑर्डरपर्यंत फटकेबाजी करण्याची ताकद आहे. आशिया चषकात तो यष्टीरक्षणासोबत सलामीवीराची भूमिका निभावू शकतो. केएल राहुलसारखा तगडा पर्याय भारताकडे आधीपासूनच आहे. तो केवळ यष्टिरक्षकच नाही, तर टॉप ऑर्डरपासून लोअर मिडल ऑर्डरपर्यंत कुठेही फलंदाजी करू शकतो. चतुर यष्टीरक्षक आणि तितकाच शांत फलंदाज म्हणून राहुल आशिया चषकासाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतो. जितेश शर्माचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी खेळताना त्याने 261 धावा ठोकल्या आणि संघाला चषक मिळवून दिले. 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचा अनुभव त्याच्याकडे आधीच आहे. त्यामुळे रिषभ पंतसाठी अगामी आशिया चषक हा ‘करो या मरो’ क्षण ठरू शकतो. त्याच्या जागेसाठी संजू, राहुल आणि जितेशमध्ये चुरस रंगली आहे. आता बीसीसीआय कोणावर विश्वास ठेवते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.







