अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?

शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला गौप्यस्फोट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, या प्रकरणाला आता राजकीय व आर्थिक वळण लागल्याचे चित्र समोर आले आहे. यादरम्यानच मंगळवारी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर, तटकरे आणि चौधरी यांच्यातील कथित आर्थिक संबंधांवरून गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तटकरे अडचणीत सापडले असल्याचे बोलले जात आहे.

सुषमा अंधारे यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कर्मा कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीत भागीदारी आहे. हे चौधरी नाव महत्त्वाचे आहे, कारण ते तटकरे (अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांच्या संदर्भात) यांच्यासोबत अनेक कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावरून अंधारे यांनी ‌‘यह रिश्ता क्या कहलाता है?’ असे समीकरण मांडले आहे. म्हणजेच, चौधरी हे तटकरेंचे भागीदार आहेत आणि तेच चौधरी चाकणकरांचेही भागीदार आहेत. या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी हा नेमका संबंध काय? असा सवाल उपस्थित करत या तिघांमधील आर्थिक नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या साखळीमुळे अंधारे यांनी थेट संशय व्यक्त करत, एकाच व्यक्तीमार्फत वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींमध्ये आर्थिक संबंध जोडले जात आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी या संबंधांना ‌‘योगायोग’ मानणे कठीण असल्याचेही नमूद केले. अंधारे यांनी पुढे सांगितले की, निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या प्रकल्पाची किंमत सुमारे 450 ते 500 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समोर येत आहे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा स्रोत काय आहे, हा महत्त्वाचा मुद्दा असून, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

महिला आयोगाच्या कामकाजावर अप्रत्यक्ष टीका करत, महिलांचे प्रश्न प्रलंबित असताना उद्योग उभारणीला प्राधान्य का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष घालावे, सर्व व्यवहारांची तपासणी करावी आणि संबंधित कंपन्यांची आर्थिक कागदपत्रे तपासावीत, अशी ठोस मागणी अंधारे यांनी केली आहे. या गंभीर आरोपांवर संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, राजकीय वर्तुळात मात्र या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धागेदोरे जोडले, सत्य अजूनही पडद्याआड!
खरात प्रकरणात एकामागून एक कनेक्शन उघड होत असताना, मोठ्या नावांची साखळी समोर येऊ लागली आहे. भागीदारी, कोट्यवधींचे व्यवहार आणि संशयित आर्थिक जाळं यामुळे प्रकरण अधिकच गडद होत आहे. मात्र, इतक्या धाग्यांनंतरही सत्यावर अजूनही पडदा असून, “नेमकं कोण कुणाशी जोडलेलं?” हा सवाल अनुत्तरीतच आहे. चौकशीशिवाय हा गुंता सुटणार नाही, हे स्पष्ट होत आहे.
आकाश चौधरी आणि आदिती तटकरे यांची भागीदारी?
शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्टिव्हेंचर इस्टेट प्रा.लि., गीतांमृत ॲग्रो इस्टेट प्रा.लि, स्वर्गांमृत ॲग्रो इस्टेट प्रा.लि. या तीन कंपन्यांमध्ये आकाश चौधरी व आदिती तटकरे यांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. आता या कंपन्यांची सध्याची नेमकी परिस्थिती काय, हे चौकशीतूनच समोर येईल, असेही अंधारे यांनी म्हटले आहे. अधिक माहिती घेतली असता या तीनही कंपन्यांमध्ये आकाश चौधरी यांनी 5 फेब्रुवारी 2018 रोजी डायरेक्टर पदाचा कार्यभार स्वीकारला, तर 12 डिसेंबर 2022 रोजी पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
हा फक्त योगायोग?
आकाश चौधरी आणि आदिती तटकरे यांची भागीदारी असलेल्या या तीन कंपन्यांची नावे आणि अनिकेत तटकरे व पत्नी वेदांती तटकरे यांच्या एकूण कंपन्यांपैकी तीन कंपन्यांची नावे ही थोडासा बदल करुन सारखीच असल्याचे समोर आले आहे.
आकाश चौधरी व आदिती तटकरे यांची भागीदारी असलेल्या कंपन्या
मल्टिव्हेंचर इस्टेट प्रा.लि.
गीतांमृत ॲग्रो इस्टेट प्रा.लि.
स्वर्गांमृत ॲग्रो इस्टेट प्रा.लि.
अनिकेत तटकरेंची भागीदारी असलेल्या एकूण कंपन्यांपैकी या महत्त्वाच्या कंपन्या
मल्टिव्हेंचर प्रॉपर्टीज्‌‍ प्रा.लि.
गीतांमृत डेअरी प्रा.लि.
स्वर्गांमृत डेअरी प्रा.लि.
Exit mobile version