एक टपरी सील करून बहादुरी; अधिकाऱ्यांची पाठ फिरताच टपऱ्या पुन्हा सुरू
| उरण | प्रतिनिधी |
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भ्रष्टाचार, भेसळखोरी आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानंतर अनेक अधिकारी आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, उरणमध्ये या मोहिमेचे रूपांतर केवळ ‘दाखवायच्या कारवाईत’ झाल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. उरण शहरात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मोठ्या गैरप्रकारांकडे डोळेझाक करत केवळ एका पानटपरीवर कारवाई करून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतीच उरणमधील एका टपरीवर कारवाई करून ती सील केली. प्रसारमाध्यमांमध्ये त्याची प्रसिद्धीही झाली. मात्र, या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर व्यवसायांवर किती परिणाम झाला, हा खरा प्रश्न आहे. उरणमध्ये अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासत खाद्यपदार्थांची विक्री, मुदतबाह्य वस्तूंची विक्री, अनधिकृत मेडिकल दुकाने, निकृष्ट दर्जाचे मिठाई उत्पादन, अस्वच्छ चायनीज सेंटर, बेकायदेशीर बार-रेस्टॉरंट, मटण-चिकन विक्री केंद्रे आणि विविध प्रकारचे खाद्य व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई होण्यापूर्वीच काही व्यावसायिकांना त्याची माहिती मिळाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. त्यामुळे अनेक संशयित व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. परिणामी अधिकारी आले, एका टपरीवर कारवाई झाली, छायाचित्रे काढली गेली आणि मोहीम संपली. त्यामुळे ही कारवाई कायद्याची अंमलबजावणी होती की, ठरवून केलेला देखावा, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे अधिकाऱ्यांची वाहने शहराबाहेर पडताच कारवाईचा धाकही संपल्याचे दिसून आले. बंद असलेल्या काही टपऱ्या आणि व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. जर कारवाईनंतर काही तासांतच परिस्थिती पूर्ववत होत असेल, तर ही मोहीम जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी होती का, असा संतप्त सवाल उरणकर उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, उरणमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांचे आणि काही व्यावसायिकांचे कथित आर्थिक साटेलोटे असल्यामुळे अनेक गंभीर गैरप्रकारांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात कोणत्या हॉटेलमध्ये कोणते तेल वापरले जाते, कोणत्या मिठाई दुकानात स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत, कोणत्या मेडिकलमध्ये नियमबाह्य औषधविक्री होते, कोणत्या बारमध्ये नियमांचे उल्लंघन होते, याची माहिती संबंधित यंत्रणांना नसणे अशक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उरणमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, काही ठिकाणी कालबाह्य खाद्यपदार्थ विक्रीचे आरोपही होत आहेत. तर, काही ठिकाणी परवान्यांशिवाय व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, अशा मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले जात नाही. त्यामुळे छोट्या टपरीवाल्यांवर धाड टाकून मोठ्या गैरप्रकारांना संरक्षण दिले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत संबंधित अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
कामकाजाच्या गुप्त चौकशीची मागणी
आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर अनेक ठिकाणी अचानक धाडी टाकून भ्रष्ट कारभार उघडकीस आणला आहे. त्यामुळे आता त्यांनी उरणमधील स्थानिक कार्यालयाच्या कामकाजाची गुप्त चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, उरणमध्ये अचानक आणि पूर्वसूचना न देता छापे टाकले, तर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता देखील नागरिक व्यक्त करत आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्वतः उरणमध्ये धडक देऊन वास्तव जाणून घेतले, तर अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक कारभारातील अनेक ‘गुपितांचे झाकण' उघडू शकते, अशी भावना आता नागरिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे.
