कार्यालय म्हणते, ठेकेदाराला उचलायला सांगितले!
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथे महावितरण विभागाच्या मालकीचे विजेचे खांब आणि साहित्य उचलले जात आहे. त्याबाबत महावितरण कंपनीकडून संबंधित साहित्य महावितरण कंपनीचे ठेकेदार उचलून नेत आहेत, अशी माहिती विजेचे खांब आणि अन्य साहित्य उचलणारे कामगार यांनी दिली आहे. परंतु, हे काम होत असताना तेथे महावितरण कंपनीचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून महावितरणचे हे साहित्य भंगारात काढून चोरीला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, महावितरणकडून ठेकेदाराला साहित्य उचलायला सांगण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये विजेचे जुने खांब मोडकळीस आले होते. त्यामुळे तेथील विजेचे खांब बदलून नव्याने लावण्यात आले. त्यांनतर जुन्या खांबांचे तुकडे करून अन्य साहित्य हे टेम्पोमध्ये भरून नेले जात आहेत. त्या ठिकाणी नेरळ गावातील सुजाण नागरिकांनी विजेचे खांब कुठे नेले जात आहेत, याची विचारणा केली असता ते दुसऱ्या ठिकाणी घेऊन चाललो आहोत, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कटर आणून जुन्या साहित्याची मोडतोड केली जात होती. मात्र, त्या ठिकाणी महावितरणचे कोणीही कर्मचारी नसल्याने ग्रामस्थांना शंका आली. तेव्हा ग्रामस्थांनी महावितरणचे सहायक अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कर्जत येथे असल्याचे कार्यालयात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नेरळ महावितरणचे सहायक अभियंता राजेश हिंगणकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील ते पडीक विजेचे खांब मेंटनस कामासाठी वापरायचे आहेत. आणि म्हणून आपणच त्यांना तेथून उचलायला सांगितले होते. ज्या ठिकाणी विजेच्या खांबांना एक्सटेंशनची गरज असते, तिथे ते अर्धवट कापून नेलेले विजेचे खांब वापरले जातात. त्याचवेळी मेंटेनन्ससाठी टेंडर निघालेले नाहीत आणि त्यामुळे हेच पोल तिथे वापरावे लागतील, असेही हिंगणकर म्हणाले.
सर्व साहित्य ठेकेदाराकडून उचलले जात असून, नवीन विजेचे खांब हे ठेकेदाराकडून महावितरण घेत असते. महावितरणचे कोणतेही साहित्य हे भंगारवाल्यांना दिले जात नाही. सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवून नंतर ठेकेदार ट्रॅक्टरमध्ये भरून सरळ करण्यास नेतो, हे सर्व साहित्य महावितरणच्या मालकीचे आहे. जुने साहित्य उचलण्यासाठी आम्ही परिपत्रक काढले आहे.
राजेश हिंगणकर, सहायक अभियंता, नेरळ महावितरण