पोलिसांची दहा हजार पदे भरणार
| मुंबई | प्रतिनिधी |
गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणत: 15 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयातील सूत्रांनी दिली.
2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणार्या पोलीस कर्मचार्यांची एकूण 10 हजार पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून, 6 सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मागील भरतीवेळी पावसाळ्यात उमेदवारांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता आगामी भरती पावसाळ्यानंतर गणेशोत्सव संपल्यावर होणार आहे.
आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहेत. सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल. दरम्यान, एप्रिल 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवेळी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाखांवर अर्ज आले होते. आताही अर्जांची संख्या त्या प्रमाणातच राहील, यादृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे. पोलीस भरतीची मैदानी एकाचवेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल.
एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन
राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलिस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसर्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल आणि तो त्याठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला, तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे.