अजित पवारांना दणका; 1000 कोटींच्या मालमत्तेवर टाच

आयकर विभागाचे जोरदार धाडसत्र
मुंबई | प्रतिनिधी |
आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अनेक दिवसांपासून आयटीच्या रडारवर
अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी 184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती.

मुंबईपासून जयपूरपर्यंत छापेमारी
दरम्यान, मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील 70 ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. 7 ऑक्टोबर रोजी हे छापे मारण्यात आले होते. या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या दोन्ही समूहाकडे 184 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले होते. ज्या दिवशी अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी करण्यात आली होती, त्यावेळी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या तिन्ही बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. कोल्हापूर आणि पुण्यात अजितदादांच्या दोन बहिणी राहतात. या छापेमारीत 2.13 बेहिशोबी मालमत्ता आणि 4.32 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही माध्यमातून मिळवलेला निधी, आदी विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचा दावा पीटीआयच्या वृत्तात करण्यात आला होता.


ही जप्त झालेली संपत्ती
जरंडेश्‍वर शुगर फॅक्ट्री
बाजार मूल्य: सुमारे 600 कोटी

साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट
बाजार मूल्य: सुमारे 20 कोटी

पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस
बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी

निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट
बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी

महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन
बाजार मूल्य: सुमारे 500 कोटी

Exit mobile version