शीतपेयातून दिल्या गुंगीच्या गोळ्या
। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या इंजिनीअर तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन चौघा नराधमांनी मुंबईत कांदिवली येथे सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नराधम आरोपींनी पीडित तरुणीकडून दहा लाख रुपये आणि दोन आयफोन उकळले. याप्रकरणी पीडितेच्या मित्रासह चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी कर्नाटक राज्यातील असून, पुण्यात आयटी क्षेत्रात नोकरीला आहे. फेसबुकच्या माध्यमातून 2021 मध्ये आरोपी खान याच्यासोबत तिची ओळख झाली होती. लग्नाच्या आमिषाने खानने तरुणीला जाळ्यात ओढल्याने ती भेटण्यासाठी कांदिवलीत गेली होती. फॅब हॉटेलमध्ये दोघे भेटले असता, खानने शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकून तरुणीला द्रव्य पाजले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर कारमध्ये नेऊन मुंबईसह पुण्यातही अत्याचार केला.
तरुणीवर कारमध्ये अत्याचार करत असताना, त्याने तिघा मित्रांना बोलावून घेतले. तिघांनी तरुणीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ३० लाख रुपये उकळले. तसेच, त्यांनी पीडितेकडून दोन आयफोनदेखील घेतले. मागील अनेक महिन्यांपासून हे ब्लॅकमेलिंक सुरू होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुख्य आरोपी मित्र तमीम खान याच्यासह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.