गावे, वाड्यांना जोडणार्या साकवांची कामे अपूर्णच; जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामांबाबत नाराजी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
गावे, वाड्यांना जोडणार्या साकवच्या निमिर्ती व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला 16 कोटी 39 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. बांधकाम विभागाने फक्त 6 कोटी 47 लाख रुपयांचा निधी खर्च केला. त्यामुळे अनेक साकवांची कामे अपूर्ण असून दहा कोटी रुपयांचा निधी पडूनच असल्याचे समोर आले आहे.
अतिवृष्टी, वादळी वार्यामुळे रस्ते खराब होत असताना, गावे, वाड्यांना जोडणारे साकवही जीर्ण झाले आहेत. काही साकवच्या दोन्ही बाजूकडील कठडे तुटलेले आहेत. जिल्ह्यातील साकवची दुरुस्ती करण्याबरोबरच नवीन साकव उभारणीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली होती. ग्रामीण भागातील साकव चांगले व्हावेत यासाठी नियोजन समितीनेदेखील निधी मंजूर केला. जिल्ह्यातील 211 साकवच्या कामांसाठी 19 कोटी 15 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली. ही कामे पावसाळ्यापूर्वी व्हावीत यासाठी 16 कोटी 39 लाख रुपयांचा निधीदेखील जिल्हा परिषद बांधकाम विभागाला वितरीत केला. पावसाळयापूर्वी साकवची कामे होण्याची अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र, नागरिकांची मोठी निराशा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली आहे. 16 कोटी पैकी फक्त सहा कोटी रुपये साकवच्या दुरुस्ती व उभारणीसाठी खर्च केला आहे. उर्वरित 10 कोटी रुपयांचा निधी गेल्या अनेक महिन्यांपासून लाल फितीत अडकून पडला आहे. निधी असूनदेखील बांधकाम विभागाकडून साकवची दुरुस्ती केली नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांची पावसाळ्यात मोठी गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
साकवांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने काही कामे करण्याचे राहिले. मात्र, पाऊस थांबल्यावर साकव दुरुस्तीची कामे तातडीने केली जातील.
राहुल देवांग, कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद बांधकाम विभाग







