कृषी कायदे रद्द!…आमच्यामध्येच कमतरता;पंतप्रधानांनी मागितली शेतकर्‍यांची माफी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मी आज देशवासियांची माफी मागत, सच्चा मनाने, पवित्र हृदयाने सांगू इच्छितो की कदाचित आमच्या तपस्येमध्येच काही कमतरता असेल. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखं सत्य आम्ही काही शेतकरी बंधूंना समजू शकलो नाही. आज गुरुनानक देवजींचं पवित्र प्रकाश पर्व आहे. हा काळ कोणालाच दोष देण्याचा नाहीय. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. या महिन्याच्या शेवटी सुरु होणार्‍या हिवाळी अधिवेनशाच्या सत्रामध्ये कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार (दि.19) गुरुनानक जयंतीनिमित्त देशाला संबोधित करताना मोठी घोषणा करत तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय.

मागील दिड ते दोन वर्षांपासून या कृषी कायद्यांवरुन देशभरामध्ये आंदोलने झाली. पंबाज आणि हरियाणामधील अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करत होते. या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांसमोर पंतप्रधान नतमस्तक झाले. आमचं सरकार शेतकर्‍यांच्या भल्यासाठी खास करुन छोट्या शेतकर्‍यांच्या हितासाठी देशाच्या भल्यासाठी शेतकर्‍यांप्रती पूर्ण समर्पण भावाने चांगल्या इच्छेने काम करत आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. कृषी कायद्यांना शेतकर्‍यांचा एक गटच विरोध करत होता. मात्र ते आमच्यासाठी महत्वाचं होतं.

कृषी अर्थशास्त्रांनी, वैज्ञानिकांनी आणि जाणकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला.आम्ही विनम्रपणे आणि मोकळ्या मनाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक माध्यमांमधून व्यक्तीगत आणि बैठकांच्या माध्यमातून चर्चा सुरु होती. आम्ही शेतकर्‍यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांना समजून घेण्याचे सर्व प्रयत्न केले. सरकार हे कायदे बदलण्यासही तयार झाली, दोन वर्षे ते लागू न करण्याचाही प्रस्ताव दिला. हा विषय नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. हे सर्व देशासमोर आहे, असे मोदी म्हणाले.

मी आज सर्व आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना आवाहन करतो की आज गुरु पर्वाचा पवित्र दिवस आहे. आता तुम्ही तुमच्या तुमच्या घरी परत जा. तुम्ही तुमच्या शेतांमध्ये परत जा, कुटुंबियांकडे परत जा. चला एक नवी सुरुवात करुयात, असं आवाहन मोदींनी केलं.

Exit mobile version