कर्जतच्या शिवसेनेत ना पाठिंबा, ना आंदोलन शिवसेना थोरवे समर्थक झाल्याचे स्पष्ट

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी बंडखोरी करीत पक्षनेतृत्व यांना सोडून गेल्यानंतरदेखील कर्जत विधानसभा मतदारसंघात नीरव शांतता आहे. दरम्यान, कर्जत आणि खालापूर तालुक्यात ना बॅनरबाजी, ना चर्चा, ना समर्थन, ना आंदोलन अशी स्थिती आहे. शिवसेनेत उभे दोन गट पडलेले असतानादेखील कर्जतमध्ये शांतता आहे.

दहा वर्षांनी कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून यावा यासाठी समस्त शिवसैनिक यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, मागील अडीच वर्षात कर्जत विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघात शिवसेनेत आपला शब्द प्रमाण आहे हे ठासून दाखवून दिले आणि त्याप्रमाणे स्वतःचे आचरण ठेवले. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत थोरवे यांच्याविरोधात पक्ष नेतृत्व यांच्याकडे तक्रार करणारे यांची संख्या जेमतेम राहिली आहे.

आपल्याला या मतदारसंघात भविष्यात विरोधक राहू नये यासाठी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम कर्जतचा आमदार पक्ष नेतृत्वाला सोडून गेल्यानंतरदेखील कर्जत आणि खालापूर तालुक्यात कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. कर्जत तालुका पंचायत समिती तसेच खोपोली नगरपरिषद आणि नगरपरिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता होती असे असतानादेखील कार्यकर्त्यांची फौज असलेल्या कर्जत आणि खालापूर तालुक्यात पक्षनेतृत्वाविरुद्ध भूमिका घेतल्यानंतरदेखील कर्जत विधानसभा मतदारसंघात ना बॅनरबाजी, ना आंदोलन, ना सोशल मीडियावर उघड विरोध, ना नेतृत्वाचे समर्थन आणि ना चर्चा अशी राजकीय स्थिती पाहायला मिळत आहे.

शिवसेनेला पालकमंत्री मिळाले पाहिजे यासाठी पालकमंत्री हटाव आणि शिवसेना बचाव या भूमिकेमुळे थोरवे यांनी शिवसेनेत आपले स्थान निर्माण केले आणि विरोधकांची बोलती बंद केली. कर्जतसारख्या जहाल शिवसैनिक असलेल्या तालुक्यात पक्षनेतृत्वाला उघड आव्हान देणार्‍या गटात सहभागी होऊनदेखील थोरवे यांच्याविरोधात कोणत्याही हालचाली पाहायला मिळाल्या नाहीत, हे या बंडाचे विशेष म्हणावे लागेल. आणि त्यातून कर्जतचा शिवसैनिक एवढा शांत कसा, याचे उत्तरदेखील त्यातून मिळत आहे.

Exit mobile version