प्रशासकीय भवन येथे मतमोजणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. यावेळी 3 लाख 18 हजार 742 मतदारांपैकी 2 लाख 40 हजार 10 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे वाढलेले मतदान नक्की कोणाला धक्का देणार आणि कोणत्या उमेदवाराला फायदा होणार, यांची गणिते राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार मांडू लागले आहेत.
कर्जत विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली असून राजकीय पक्षांनी गेली 20 दिवस जोरदार प्रचार केल्याने मतदारांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला आहे. कर्जत मतदारसंघात नऊ उमेदवारांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यात शिवसेना पक्षाचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार म्हणून महेंद्र थोरवे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नितीन सावंत आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांनी चांगला प्रतिसाद सकाळच्या सत्रात दिला होता. झालेल्या एकूण मतदानापेक्षा निम्म्याहून अधिक मतदारांनी दुपारी 1 पर्यंत मतदान केले होते. दिवसभरात तब्बल 2 लाख 40 हजार 10 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 1 लाख 22 हजार 740 पुरूष मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला, तर 1 लाख 17 हजार 279 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, एका तृतीय पंथीय मतदारानेदेखील मतदानाचा अधिकार बजावला.
मागील निवडणुकीत 2019 मध्ये 70.11 टक्के मतदान झाले होते आणि त्यावेळी 2 लाख 278 मतदारांनी मतदान केले होते. तर, 2024 मध्ये 75.30 टक्के मतदान झाले असून यावेळी झालेले मतदान हे 2 लाख 40 हजार 10 एवढे म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा तब्बल 40 हजार मतदारांनी अधिकचे मतदान केले आहे. तर, मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 67 टक्के मतदान झाले होते. याचा अर्थ सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 7 टक्के मतदारांनी अधिक प्रमाणात मतदान केले आहे.