अन्यथा त्याच वर्गात बसावे लागणार; शालेय शिक्षण विभागाने काढले आदेश
| पनवेल| वार्ताहर |
राज्य शासनाच्या शालेय विभागाने यावर्षी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होते; परंतु पहिली ते आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही, असे धोरण आरटीई अंतर्गत 2010 पासून सुरू आहे. आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, अन्यथा त्यांना नापास झाल्यास त्याच वर्गात बसावे लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले असल्याचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी सांगितले.
पनवेलमध्ये सरकारी व खासगी मिळून 555 शाळा असून जवळपास दोन लाख 10 हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. शालेय शिक्षण विभागाने आरटीई कायदा लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे 2010 पासून पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही; परंतु पुढे जाऊन अनेक विद्यार्थी दहावी, बारावीत अभ्यासक्रमात पिछाडीवर राहिले आणि अनेकांनी मधूनच शाळादेखील सोडल्याची उदाहरणे समोर आली.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय विस्तृतपणे समजावेत, या हेतूने आता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात जाता येणार नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपत्रिकांचा नमुना तयार करण्यात आला आहे. त्या धर्तीवर शाळांना प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत.
30 दिवसांत पुन्हा संधी इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत जे विद्यार्थी अनुतीर्ण होतील, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. एक महिन्यानंतर त्यांची पुन्हा एकदा शाळास्तरावर परीक्षा होईल. त्यावेळी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील, त्यांना नव्या शैक्षणिक वर्षापासून पुढील वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे, असा नवा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षांपासूनच्या नवीन बदलानुसार पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दुसरी संधी देऊनही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागणार आहे.
आठवीपर्यंत सरसकट उत्तीर्ण करणारे धोरण आता राज्य सरकारने रद्दबातल ठरवलेले आहे. यापुढे पाचवी ते आठवी या वर्गासाठी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होणार आहे. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याला पुन्हा त्याच वर्गात बसवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
सीताराम मोहिते,
गटशिक्षण अधिकारी, पनवेल
