72 पैकी 28 निवारा शेड मंजूर; फक्त 6 ठिकाणी कामे प्रगतीपथावर
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने भूस्खलन, जमिनींना भेगा पडणे, दरड कोसळणे अशा घटना घडत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडींचा धोका कायम आहे. त्यामुळे शासनाने 72 दरडग्रस्त गावांपैकी 28 ठिकाणी निवारा शेड मंजूर केले असून, प्रत्यक्षात मात्र 6 ठिकाणीच कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीदेखील प्रशासन झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिक गतिमान होण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता पावसामुळे संबंधित मंजूर झालेली कामे सुरू झाली नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्याकडून देण्यात आली.
महाड तालुका हा डोंगराळ भाग असून, तालुक्याचा 80 टक्के भाग दऱ्या खोऱ्यात वसलेला आहे. या सर्व भागामध्ये 1995 सालापासून सातत्याने दरडी कोसळत आहेत. त्यामुळे महाडसह पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत आली आहेत. त्याबाबत प्रतिवर्षी कागदोपत्री नियोजन केले जात आहे. प्रत्यक्षात या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये अद्याप उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. महाडमध्ये दरडप्रवण क्षेत्रामधून भूस्खलन होण्याच्या शक्यतेने पावसाळ्यात अनेक नागरिकांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा महसूल विभागाकडून दिल्या जातात. तर, काही दुर्गम व डोंगराळ भागातील भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. मात्र, शासनाकडून 28 ठिकाणी निवारा शेडची कामे मंजूर असून प्रत्यक्षात मात्र 6 ठिकाणी प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाड तालुक्यात संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीत लोअर तुडील, नामावले कोंड, शिंगरकोंड मोरेवाडी, आंबिवली पातेरीवाडी, कोंडीवते मूळ गावठाण, सव, सोनघर, जुई बुद्रुक, चांढवे खुर्द, रोहन, वलंग, कोथेरी जंगमवाडी, माझेरी, पारमाची वाडी, कुंबळे, कोसबी, वामने, चिंभावे बौद्धवाडी, वराठी बौद्धवाडी, चोचिंदे, चोचिंदे कोंड, गोठे बुद्रुक, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, कुर्ला दंड वाडी, रावतळी मानेचीधार, मोहोत सुतारवाडी, मांडले, पिंपळकोंड, मुमुर्शी आंब्याचा कोंड, मुमुर्शी गावठाण, मुमुर्शी बौद्धवाडी, वीर गाव, वीर मराठवाडी, टोळ बुद्रुक, दासगाव भोईवाडा, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, नडगाव काळभैरव नगर, पुनाडेवाडी, पाचाडवाडी, सांदोशी हेटकर कोंड, शेलटोळी, अंबेशिवथर, वाळण बुद्रुक, नाणे माची, कोंडीवते नवीन, हिरकणी वाडी, पाचाड परडी वाडी, वाघेरी आदिवासी वाडी, कोथेरी तांदळेकर वाडी, करंजाडी म्हस्के कोंड, नातोंडी धारेची वाडी, गोंडाळे, खर्डी, पांगारी मनवेधार, वरंध पोकळे वाडी, वरंध बौद्धवाडी, आड्राई, वाळण झोळीचा कोंड, वाळण केतकीचा कोंड, भीवघर, पिंपळवाडी, रुपवली, निगडे, बारसगाव, कोथेरी, ओवळे, खरवली व तळीये या 72 गावांचा समावेश आहे. 2021 मध्ये तळीये गावामध्ये भुस्खलन झाल्यानंतर राज्य सरकारच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणावर दरडग्रस्त गावांमध्ये निवारा शेड बांधण्याचे धोरण केले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. नसल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाकडून दिरंगाई
महाड तालुक्यातील रूपाली बौद्ध वाडी सुंबे कोंड, भिवघर, जुई बुद्रुक सोनघर, माझेरी, कोंडी वते मूळ गावठाण, मोहोत सुतारवाडी व भिसे वाडी, पातेरेवाडी आंबिवली बुद्रुक, वरद पोकळेवाडी कुंभार कोंड व वरंध बौद्धवाडी या गावांसाठी खासगी ठिकाणी निवारा शेड बांधण्यात येणार आहेत. परंतु, ती जागा संबंधित ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली आहे. तसेच, सव, दासगाव भोईवाडा, काळभैरव नगर नडगाव, कोठेरी तांदळेकर वाडी, करंजाडी म्हस्के कोंड, नातोंडी धारेची वाडी, शेल टोली व चाडवे खुर्द या गावांसाठी शासकीय जागेवर निवारा शेड बांधण्यात येणार आहेत. बांधकाम विभागाकडून पावसाचे कारण देत कामाची चालढकल करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. जी कामे पावसळ्यापूर्वी होणे गरजेचे होते ती अद्याप प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून हजारो नागरिकांना निवारा शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचे धोरण शासनाच्या महसूल विभागाच्या कागदोपत्रीच असल्याचे समोर येत आहे.







