। उरण । प्रतिनिधी ।
लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ थोड्याच दिवसांत सुरू होणार आहे. याठिकाणी 25 हजारपेक्षा जास्त नोकर भरती आणि रोजगार उपलब्ध होणार असून येथील स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी भूमिपुत्रांसाठी आवाज उठवणारा लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतम म्हात्रे यांनाच निवडून देऊन त्यांनी आमदार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी केले आहे.
रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले की, जेएनपीटीमध्ये जवळपास साडेतीनशे कामगार काम करत आहे. यात एकही स्थानिक कामगार नसून सर्व गुजरातवरून आलेले कामगार आहेत. तेथील आमदार, खासदार, मंत्री आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी तिथल्या तरुणांना याठिकाणी रोजगार देण्याचा प्रयत्न करतात. याला आपल्या लोकप्रतिनिधीने विरोध करून तो रोजगार येथील भूमिपुत्राला मिळावा म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. पण दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असल्याने तेरी भी चुप, मेरी भी चुप अशा पद्धतीने स्थानिकांवर अन्याय होत आहे. दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात सुद्धा देशपातळीवरील भाजपचे नेते आपल्या मतदारसंघातील तरूण याठिकाणी नोकरीसाठी पाठवून येथील स्थानिकांचा हक्काचा रोजगार आणि नोकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतील. तो हक्काचा रोजगार आणि नोकरी येथील भूमिपुत्राला मिळावी म्हणून स्थानिक उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन रमाकांत म्हात्रे यांनी केले आहे.