गोगावलेंना फशी पाडलं, स्वतःची पोळी भाजली

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्याकडे सरकारने जबाबदारी दिली. याबाबत महाडचे आ. गोगावलेंच्या मनात राग निर्माण करुन तसेच गोगावले यांना पालकमंत्र्यांचे स्वप्न दाखविणारे आमदार दळवीच असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. गोगावले विरुध्द तटकरे यांच्यात वाद निर्माण करून ते स्वतःची पोळी भाजून घेत असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. शिंदे गटातील आमदारांना डावलून त्या जिल्ह्याचे निर्णय घेऊ लागल्या. त्यामुळे अहंकार दुखावल्याने आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून काढण्याचा डाव शिंदे गटातील काही मंडळींनी आखला, हे काही लपून राहिलेले नाही. गोगावलेच रायगडचे पालकमंत्री असे भासवून तटकरेंविरोधात षडयंत्र करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये आमदार भरत गोगावले यांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याचे बोलले जाते.

तटकरे विरुध्द गोगावले यांच्यामध्ये वाद निर्माण करून दळवी यांनी खासदार तटकरे यांच्यासोबत मैत्री जपली. आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद हटाव या भूमिकेत शिंदे गटातील आमदार राहिले. मात्र, दळवी यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. तुम लढो…हम कपडे संभालते है, अशी भूमिका ठेवत पडद्याड राहून आदिती तटकरे यांचे पालकमंत्री पद घालविण्यात आले. महायुतीच्या सरकारमध्ये झालेल्या मंत्रीपद विस्तारानंतर गोगावलेंना ते पद मिळण्याची आशा होती. परंतु, त्यांना पालकमंत्री पद मिळाले नाही. गोगावले व तटकरे यांच्या भांडणात दळवी यांनी मात्र, स्वतःची पोळी भाजून घेतल्याची चर्चा सुरु आहे.

Exit mobile version