जनताच तटकरेंना रायगडातून तडिपार करणार: अनंत गीते

आजची सभा पाहिली, सभेचा जोश पाहिला तर मैदान तर खचाखच भरले असून, अनेकांना आत यायलासुद्धा जागा नाही. हे चित्र पाहून मला असं वाटलं, की ही माझ्या प्रचाराची सभा नसून, विजयाची सभा आहे, असा विश्वास अनंत गीतेंनी व्यक्त केला. पवारसाहेब हा निर्धार येथील जनतेने केलाय की, आपकी बार तटकरेंना तडिपार करुन अनंत गीतेंना किमान दोन लाखांच्या फरकाने विजयी करणार, असे गीतेंनी पवारांना सांगितले.

गीतेंनी सांगितले की, एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करायला पाहिजे, की मी मूळ शिवसैनिक असलो, तरी माझी उमेदवारी उद्धवसाहेबांकडे पवारसाहेबांनी मागितली. आणि, माझ्या उमेदवाराची घोषणा आ. जयंत पाटील यांनी श्रीवर्धनमध्ये चार महिन्यांपूर्वी केली. आणि, याच व्यासपीठावरुन भाईंनी मंत्रीपत्रही जाहीर केलेय. इंडिया आघाडी ही देशाची आजची गरज आहे. आणि ही गरज ओळखून देशातील विविध राजकीय पक्ष केवळ राष्ट्रहिताकरिता, लोकशाही वाचविण्याकरिता, संविधान वाचविण्याकरिता सगळे मतभेद विसरुन एकत्र आले आहेत. इंडिया आघाडी म्हणून अतिशय उत्तम असे मनोमीलन या रायगड मतदारसंघात झाले असून, सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याचे गीते म्हणाले. काल आंबेतच्या बैठकीसाठी गेलो असता तेथील जनतेने सांगितले की, या आंबेतच्या खाडीमध्ये त्यांचे आम्हाला विसर्जन करायचे आहे. त्यांच्या फसवाफसवीच्या राजकारणाला सर्व कंटाळले असून, कोणी मित्र शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे सगळेच अनंत गीतेंचे मित्र झाल्याचेही ते म्हणाले. आता सगळे राग काढणार असून, त्यांना त्याची कल्पना आहे. मोर्ब्याच्या इतिहासातील सर्वात विक्रमी सभा असल्याचेही ते म्हणाले. गावोगावी होणाऱ्या प्रचारसभांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून, येथील जनता, मतदार तटकरेंविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. तसेच वातावरण देशभरात आहे. त्यामुळे मोदींच्या विरोधात या देशात त्सुनामी आल्याशिवाय राहणार नाही, असेही गीते म्हणाले. ही लढाई तत्त्वांची असून, या महाराष्ट्रात झालेले गलिच्छ, नीच राजकारण तमाम जनतेला रुचलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राची जनता राग काढणार असल्याचे गीतेंनी सांगत आपल्या विजयाचा रायगडच्या जनतेने निर्धार केला असून, सर्वांच्या पुण्याईने ही लोकसभा किमान दोन लाखांच्या फरकाने जिंकणार, असा विश्वास शेवटी व्यक्त केला.  

मोदी साहेबांची गॅरंटी कुठे गेली: सुभाष देसाई
आज कोट्यवधी तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी कर्जबाजारी आहे. महागाई वाढत आहे, संविधान धोक्यात आहे. मग असे असताना मोदी साहेबांची गॅरंटी गेली कुठे, असा संतप्त सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. सध्या भाजपाची कोणतीही गॅरंटी नाही. देशाची कोणतही गॅरंटी नाही. गॅरंटी आहे ती फक्त मोदी साहेबांची, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आगामी निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवून, सर्व मतभेद विसरुन इंडिया आघाडीचे उमेदवार अनंती गीतेंना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
गद्दारोंको खुद्दारीसे हरायेंगे: सुषमा अंधारे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला, त्यामुळे तटकरे खासदार झाले. शरद पवार यांचा शब्द मानून आ. जयंत पाटील यांनी तटकरेंच्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवले. मात्र, त्याच जयंत पाटील यांच्याशी सुनील तटकरे यांनी गद्दारी केली. शरद पवार यांनी तटकरेंना खूप मोठे केले. पण, त्यांच्यासोबत गद्दारी करण्याचे काम तटकरे यांनी केले आहे. या तटकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे अंधारे म्हणाल्या. शरद पवार यांची साथ होती. तोपर्यंत सुनील तटकरे यांना मान होता. ही लढाई खुद्दार विरुद्ध गद्दार अशी असणार आहे. ही लढाई अस्तित्वाची असून, तुमच्या-आमच्या हक्काची असणार आहे, असेही अंधारे यांनी सांगितले. देशात गलिच्छ राजकारण भाजप करत आहे. हिंदू-मुस्लिम समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेक इंन इंडियाचे काय झाले, असा संतप्त सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, ही लढाई महिला सुरक्षेसाठी, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाची, शेतकऱ्यांच्या हितासाठी असणार आहे. देशात जाती-जातीमध्ये वाद निर्माण करणे, बेरोजगारी, महिला असुरक्षिता, महागाई प्रचंड आहे. या निवडणुकीत अन्यायाविरोधात मशाल पेटवण्यासाठी सज्ज व्हा, विजयाची तुतारी वाजवण्यासाठी सैनिक तयार झाला आहे. या निवडणुकीत तटकरे यांना गुलाल उधळण्यास मिळणार नाही, असा टोला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तटकरेंना लगावला.  
तटकरे, आपल्याला अजून काय देणे बाकी होते: जितेंद्र आव्हाड
स्वतः पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, मुलीला मंत्रीपद, मुलाला, भावाला, पुतण्याला आमदार केले. एकाच घरात पाच-पाच पदं  दिली, अजून काय द्यायचे बाकी होते असा सवाल करीत पवार घराणे तोडण्याचे पाप कोणी केले असेल, तर ते सुनील तटकरेंनी केले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंचे नाव घेऊन केली. आधी अंतुलेंना फसवलं, त्यांच्याच पुतण्याला पक्षात घेऊन खांद्यावर हात टाकून फिरत आहात. अंतुलेसाहेब वरुन पाहात असतील, तर ते तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ही फसवाफसवी आता चालणार नाही. रायगडची जनता सुज्ञ असून, आता तुमच्या कोणत्याही आमिषाला भीक घालणार नाही, असा घणाघात त्यांनी तटकरेंवर केला. तटकरे साहेब एवढचं सांगा की, आपल्याला अजून काय द्यायचे बाकी होते? आ. जयंत पाटील  तटकरेंना चांगले ओळखत असल्याने कायम सांगायचे, यांना मंत्री करु नका, तरी त्यांचा विरोध डावलून साहेबांनी तुम्हाला सर्वकाही दिले. त्यांचेच घर फोडण्याचे काम आपण केलेत. त्यामुळे जयंत पाटील तटकरेंविषयी असे का सांगत असतील, याबाबत आता पटत असल्याचे आव्हाड म्हणाले. तटकरे साहेबांचे इतके जवळचे होते की, त्यांच्या घरात सकाळी सात वाजता जाण्याचा अधिकार त्यांना होता. परंतु, 2014 पासून ते आता 2024 पर्यंत पवारांच्या जवळ सकाळी जायचे, आणि आणि फक्त एवढंचे बोलायचे, साहेब आपण भाजपात जाऊया. आणि बाहेर येऊन सांगायचे साहेबांनी तर हो बोलले होते. पण, तुम्हाला सांगतो, साहेब हो कधी म्हणाले नव्हते. स्वतःचे भ्रष्टाचार लपविण्यासाठी यांना भाजपात जायचे होते, असा आरोपही आव्हाडांनी केला.  साहेब कधीच जातीयवादी लोकांसोबत हातमिळवणी करणार नाहीत, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. आपलं घर तुटताना दिसत होते, परंतु, साहेब कधी बोलले नाहीत, की घर न तुटण्यासाठी भाजपमध्ये जाऊया. घर तुटले तरी चालेल, पण महाराष्ट्राच्या मातीची साथ सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
गीतेंना प्रचंड मतांनी विजयी करा: अनिल नवगणे
आपल्याला देश वाचवायचा असेल, देशातील लोकांचे भविष्य घडवायचे असेल, तर इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या मशाल चिन्हासमोर 7 मे रोजी बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेना दक्षिण रायगडचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी केले. देशात लोकशाही संपवून हुकूमशाहीच्या दिशेन वाटचाल सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संविधान संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यांनी आता ही निवडणूक हातात घेतली आहे. प्रत्येकाच्या मनात अनंत गीते यांचेच नाव आहे. देशाच्या भवितव्यासाठी मोदी परत येऊ नये, ही जनतेची भावना आहे. मोदी परत आले तर संविधान बदलायच असून, त्यांना भाजप एकच पक्ष ठेवायचा आहे. असे झाले तर देशात लोकशाही राहणार नाही. त्यामुळे हे चित्र बदलायचे असून, त्यासाठी आपल्याला या देशाचा पंतप्रधान राहुल गांधी करावे लागेल. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
देशासाठी मुस्लिम बांधवांचे योगदान मोठे: पालकर
आजच्या राजकारणात मुस्लिम बांधवांप्रती क्लेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना अपशब्द वापरा, तरच राजकारणात टिकू शकता, असे राहूल गांधी यांना सांगितले. त्यावेळी त्यांना ते अमान्य केले. कारण देशासाठी मुस्लिम बांधवांचे योगदान खूप मोठे असल्याचे सांगितले. त्यांचे विचार हे सर्वधर्म समावेशक आहेत, त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीसोबत असून आगामी निवडणूकीत अनंत गीते यांना भरघोस मतांनी निवडून द्या.
Exit mobile version