चंदिगड | वृत्तसंस्था |
स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी वय नव्हे तर जिद्द हवी हे चंदिगडमधील हरभजन कौर या आजीबाईंनी सिद्ध करून दाखकले आहे. या आजीबाईंनी वयाच्या नव्वदीत मेड विथ लव्ह नावाचा स्वत:चा फूड ब्रँड सुरू केला असून त्याअंतर्गत त्या हाताने बनविलेल्या बेसन बर्फी आणि लोणची विकतात. चंदिगडसह अन्य शहरांत त्यांची उत्पादने लोकप्रिय आहेत. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
हरभजन या सर्वसामान्य हिंदुस्थानी गृहिणी आहेत. आयुष्यभर आपल्याला स्वावलंबी होता आले नाही ही त्यांच्या मनात खंत होती. एके दिवशी त्यांनी ही खंत आपली मुलगी रवीनाला बोलून दाखवली. आपली मुलगी आपले बोलणे इतके गंभीरपणे घेईल असे त्यांना वाटले नव्हते. मुलीने त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. चार ते पाच वर्षांपूर्वी हरभजन यांनी व्यवसाय सुरू केला. त्या वेळी त्या 90 कर्षांच्या होत्या. चंदिगड येथील लोकल मंडईत त्यांनी घरगुती पद्धतीने बनवलेल्या मिठाईचा स्टॉल लावला.
मिठाई झटपट विकली गेल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आता त्यांनी बनवलेली बर्फी, लोणची आदी उत्पादनांना देशभरातून मागणी आहे. दुसऱ्या लाटेत कौर यांना कोरोनाची लागण झाली त्यावरही मात करत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.