न्यायासाठी कायदेशीर पाठपुरावा करू
। परभणी । प्रतिनिधी ।
पोलीस कोठडीत मारहाण झाल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे आणि याला पोलिसच जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती पूर्णतः खोटी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्यघटनाविरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमाला कारणीभूत आहे. या प्रकरणात आम्ही पूर्ण चौकशीची मागणी करणार आहोत. यातून सत्य बाहेर येईल व सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळेल, सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढ्याचा पाठपुरावा करू, असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी सोमवारी (दि.23) दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि तब्बल 25 मिनिटे कुटुंबीयांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या प्रकरणामध्ये झालेल्या अत्याचाराची राहुल गांधी यांनी माहिती घेतली. यावेळी, सूर्यवंशी यांच्या आईने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ‘माझ्या मुलाची हत्याच झाली आहे, मला न्याय मिळवून द्या,’ अशी मागणी केली. यावर राहुल गांधी यांनी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. कायद्याद्वारे निश्चित न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले आहे.
यावेळी, माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना मी भेटलो असून ज्या लोकांना मारहाण झाली त्यांनाही भेटलो आहे. सूर्यवंशी कुटुंबीयांनी मला शवविच्छेदन अहवाल दाखविला. व्हिडिओ देखील दाखविला, मी काही छायाचित्रेही पाहिली. हा शंभर टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी सूर्यवंशी यांची हत्या केली असून पोलिसांना मेसेज देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटे बोलले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचेही सांत्वन केले.
यावेळी, राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आमदार सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.