| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे. या विमानतळावरुन लवकर विमानांचे उड्डाण होणार आहे. 5 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या विमानतळावर 4 टर्मिनल आहे. त्या ठिकाणी जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क करता येतील एवढी क्षमता आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात उलवा आणि पनवेलदरम्यान 1,600 हेक्टर जमिनीवर तयार होत आहे. त्यासाठी सिडको नोडेल एजन्सी म्हणून काम करत आहे. 19 हजार 600 कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात येत आहे. हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रॉजेक्ट 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे. सिडकोचे निर्देशक विजय सिंघल आणि संयुक्त प्रबंध निदेशक शांतनु गोयल या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवत आहेत. नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही कमी होणार आहे.