| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 8 ऑक्टोबरला केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या विमानतळाच्या लोकार्पणास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विमानतळ तयार झाल्याने आता ठाणे, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना विमानतळ मानत गाठणे सुलभ होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा 2025 अखेर पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्याद्वारे दरवर्षी सुमारे 20 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प 2038 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याचे सरकारचे नियोजन आहे. विमानतळ प्रकल्पाचे महत्व विचारात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील स्थानिक क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास रायगड, ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली इत्यादी भागातील प्रवाशांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध भागांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार आहे.
काय आहे प्रकल्प
2016 मध्ये नवी मुंबई विमानतळ विकसित करण्यासाठी सिडकोने जागतिक स्तरावर निविदा मागविली होती. या विमानतळाच्या विकासासाठीचा करार 25 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एमआयएएल) यांना देण्यात आला. यानंतर एमआयएएल आणि सिडको यांनी एकत्र येऊन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडची (एनएमआयएएल) स्थापना केली. या संस्थेमार्फत नवी मुंबईतील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे विकास, बांधकाम, संचालन आणि देखभाल यांची जबाबदारी सांभाळली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने, डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्स्फर या तत्त्वावर राबविण्यात येत आहे. एनएमआयएएलमधील 74 टक्के भांडवल एमआयएएलकडे असून उर्वरित 26 टक्के भांडवल सिडकोकडे आहे. एप्रिल 2021 मध्ये अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले.
विमानतळ गाठण्यासाठीचे मार्ग
पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्ग उत्तम पर्याय आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंड एरोली मार्गे अथवा ठाणे-कळवा-विटावा, दिघा मार्गाने, पुढे ठाणे-बेलापूर मार्गे, बेलापूर उलवे रस्त्याने विमानतळ गाठता येऊ शकते.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गाने जेव्हीएलआर, पूर्व द्रुतगती महामार्ग, वाशी खाडी पूल मार्गे पुढे उलवे मार्गे विमानतळ गाठता येईल. दक्षिण मुंबई येथून अटल सेतू, उलवे बेलापूर मार्गे विमानतळ गाठता येईल. वसई, पालघर, मिरा रोड या भागातील नागरिक फाऊंटन, गायमुख, घोडबंदर-ठाणे मार्गे, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे बेलापूर रोड येथून विमानतळावर पोहचू शकतात.
नवी मुंबई येथून एरोल, दिघा भागातील रहिवासी पाम बीच रोडने नेरुळ-बेलापूर-उलवे मार्गे किंवा ठाणे बेलापूर रोडने बेलापूर- उलवे मार्गे जाऊ शकतील. खारघर, पनवेल भागातील रहिवासी शीव पनवेल मार्गे कळंबोली चौक, पनवेल उरण मार्गे विमानतळ गाठतील.
कल्याण, डोंबिवली ते अंबरनाथ, बदलापूर येथील रहिवासी शिळफाटा मार्गे शीव पनवेल महामार्ग, उलवे बेलापूर रोडने विमानतळ गाठू शकतात.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकाने ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग यासाठी या अंदाजित 6 हजार 363 कोटी खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. काही मेट्रो मार्गिका देखील विमानतळापासून काही मीटर अंतरावर धावणार आहे. तसेच मुंबईत ते नवी मुंबई विमानतळ जलवाहतूकीचा पर्याय देखील भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
