हवामान खात्याकडून अलर्ट
। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपुर्वीच मुरुड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी, नागरिक, मच्छिमार बांधव मेटाकुटीला आला. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळाला. पण येत्या दोन दिवसांत राज्यात पुन्हा एकदा विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.
राज्यात विश्रांती घेतलेल्या पाऊस आता पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावणार आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी पाऊस दडी मारणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेअसले तरी उद्यापासून म्हणजेच रविवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झाल्याचंही पाहायला मिळालं. अशात आता विकेंडनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
रविवारी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी काही ठराविक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.