| पोलादपूर | प्रतिनिधी |
गेल्या 23 जुलै 2022 रोजी पोलादपूर शहराला नळपाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलला चोळई व सावित्रीच्या संगमावर जलसमाधी मिळाल्याने आता आंबेनळी घाटातील सर्वच काँक्रिटचे जॅकेट घालण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन जीर्ण पुलांवर झाडं उगवल्याने धोक्याची घंटा वाजू लागली आहे. 2021 मध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते प्रतापगड आणि पुढे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड ते महाबळेश्वर असा रस्ता अतिवृष्टी आणि भूस्खलनाने बाधित झाल्यामुळे पोलादपूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ठेकेदारांचे उखळ पांढरे करून दिल्यानंतर आता कायमस्वरूपी उपाय करण्याऐवजी आगामी काही पावसाळे उखळ पांढरे करण्याचा धंदा कायम ठेवण्याचा विचार राजकीय इच्छाशक्तीच्या पाठिंब्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने कायम ठेवला आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
आंबेनळी घाटातील चार जीर्ण ब्रिटिशकालीन पुलांना गेल्या 2016 मध्ये काँक्रिटचे जॅकीट घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूरने केले. यानंतर पहिल्याच पावसातच मोरगिरी फौजदारवाडी फाट्याजवळच्या पुलावरील रस्ता खचल्याने कामाचा दर्जा उघड झाला. मात्र, गेल्या वर्षभरात बांधलेल्या मोरीजवळील धबधब्याच्या पाण्यामुळे मोरीजवळचा रस्ता खचून वाहू लागला असून, घाटातील एकेरी वाहतूक आता केवळ छोट्या वाहनांसाठी सुरू आहे. परिणामी, आंबेनळी घाटातील जॅकीटधारी पुलांवरून तुरळक वाहतूक सुरू असल्यानेच हे पूल अद्याप शाबूत आहेत. या सर्व कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असून, सरकारचा सुमारे नऊ कोटींचा निधी या कामावर खर्च झाल्यामुळे लाभार्थीचे काय करायचे, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबतही स्वतंत्र चौकशी करून निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग या रस्त्यावरील संरक्षण भिंत व रूंदीकरण, मोऱ्यांचे बांधकाम, मोठ्या मोरीचे बांधकाम, अभियांत्रिकी दुरूस्ती, अभियांत्रिकी सुधारणा, संरक्षण भिंत बांधणे अशी प्रत्येकी 20 लाख रूपये खर्चाची सहा कामे करण्याचा डिसेंबर 2015 मध्ये शुभारंभ आ. गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी, पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील चार ब्रिटिशकालीन पुलांच्या कामांचीही तरतूद करण्यात आली होती. सदर सहा कामांची एकूण अंदाजे खर्चाची मंजुरी 1.20 कोटी रूपयांची असल्याची माहिती तत्कालीन डेप्युटी इंजिनियर जाधव यांनी दिली होती. या कामांतर्गत पोलादपूरच्या चोळई आणि सावित्री नदीच्या संगमावरील लेप्रसी हॉस्पिटलजवळील पुलासाठी 60 लाख, मोरगिरी फौजदारवाडी फाट्याजवळील पुलासाठी 35 लाख, कापडे बुद्रुक भवानवाडीजवळील पुलासाठी 26 लाख आणि आड-पायटे-कापडे खुर्द येथील पुलासाठी 45 लाख अशा चार ब्रिटिशकालीन पुलांना काँक्रीटचे जॅकेट करण्यात आले आहे. या सुमारे दीडशेहून अधिक वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन दगडी पुलांच्या खांबांच्या बांधकामांना अर्ध्या उंचीपर्यंत सिमेंट काँक्रीटची बंदिस्ती करण्यात येऊन या जॅकेटधारी पुलांची रूंदीदेखील वाढविण्यात आली आहे. मात्र, पुलाचे स्लॅब रूंद करताना ते मजबूत आहेत, अथवा कसे याबाबत कोणताही अभिप्राय सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूरने दिलेला नाही. या सर्व कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असून, सरकारचा सुमारे 9 कोटींचा निधी या कामावर खर्च झाल्यानंतरही भर पावसाळ्यात केवळ दरडग्रस्त असल्याचे कारण पुढे करून रहदारीमुक्त करीत चारही पुलांच्या जॅकेट बांधकामाला अनोखी सुरक्षा प्रदान करणाऱ्या लाभार्थींचे काय करायचे, याबाबतही स्वतंत्र चौकशी करून निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त होते आहे.
पोलादपूर ते प्रतापगड आणि पुढे महाबळेश्वरपर्यंतचा आंबेनळी घाट ठिकठिकाणी दरडग्रस्त झाल्यानंतर पोलादपूर ते प्रतापगडदरम्यान सिमेंट काँक्रीटचे जॅकेट घालून आजमितीस उभे असलेल्या जीर्ण ब्रिटिशकालीन पुलांना महाड एमआयडीसीजवळच्या सावित्री नदीवरील पुलाप्रमाणे अचानक जलसमाधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्गावरील गेल्या 12 वर्षांत झालेल्या सर्व कामांची दर्जा व गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अभियंत्यांकडून निष्पक्षपणे चौकशी करण्याची गरज असून, सातारा जिल्ह्यामध्ये या रस्त्याचे रूंदीकरण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.