मुरूड समुद्रात ‘लेदर जॅकेट फिश’चा ‘जॅकपॉट’

। मुरूड । प्रतिनिधी ।

मुरूड जंजिरा परिसरातील समुद्रकिनारपट्टीत मासळी मिळत नसल्याने दुष्काळ पडला होता. मच्छीमार अक्षरशः मेटाकुटीला आले होते. मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. परंतु अचानक मुरुडच्या समुद्रात मच्छीमारांना परदेशात निर्यात होणारी ‘चप्पल’ नावाची मासळी मिळू लागली आहे. गेल्या 10 दिवसात 10 टन मासळी मिळाल्याचे समजले आहे. नाव जरी विचित्र वाटले तरी या मासळीची किंमत आणि लोकप्रियता अधिक आहे. या मासळीचा बंपर जॅकपॉट लागल्याने मच्छीमार मालामाल झाल्याची माहिती मिळाली आहे.

मासेमारीच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील अशी घटना घडणे, म्हणजे ईश्‍वराची लीला अगाध असल्याची प्रतिक्रिया अनेक मच्छीमारांकडून ऐकायला मिळत आहे. मुरूड परिसरात या मासळीबाबत फारशी माहिती नाही. कोळी बांधवदेखील पूर्वी दुर्लक्ष करीत असत. मात्र मुंबईत याला मोठे मार्केट मिळाले आहे. पापलेट मासळी सारखीच ही अत्यंत चविष्ट मासळी असल्याचे मच्छीमारांनी सांगितलेे. दालदी जाळी असणार्‍या नौकांना सुमारे 30 ते 40 वाव म्हणजे 70 ते 80 किमी समुद्रात गेल्यावर ही मासळी मिळते. ही मासळी समुद्रातुन परस्पर विक्रीसाठी रोज मुंबईत जाते. होळीनंतर चप्पल मासळी अचानक मिळायला लागल्याची माहिती मिळताच मच्छीमारांनी त्वरित समुद्राकडे कूच केले होते, अशी माहिती रोहन निशानदार यांनी दिली. मासळीचा सिझन सध्या असाच कायम राहील, असे संकेत मच्छीमारांतून व्यक्त होत आहेत.

‘चप्पल’ मासळीचे नाव अनेकांना नवीन असले तरी परदेशात या मासळीला मोठा भाव मिळतो. देशात तसेच परदेशात ‘लेदर जॅकेट फिश’ या नावाने ओळखली जाणारी ही मासळी निर्यात होते, हे अनेकांना माहितच नाही. अत्यंत चविष्ट अशी ही मासळी असल्याची माहिती मुरूड कोळी समाजाचे ज्येेष्ठ नेते तथा रायगड मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मुरूड समुद्रकिनारपट्टीत मत्स्यव्यवसाय विभाग, मुरूड पोलीस दल आणि तटरक्षक खात्याने काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर एलईडी, पर्सनीनसारख्या बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाई करून बंदी घातल्याने समुद्रात पारंपरिक मच्छीमारांना चप्पलसारखी महत्वाची आणि किंमती मासळी मिळू लागल्याने मच्छीमार आभार व्यक्त करीत आहेत.

1 जूननंतर दरवर्षाप्रमाणे पावसाळी मासेमारी बंद होणार असल्याने राहिलेल्या आता केवळ दीड महिन्यात मासेमारी सिझनमध्ये मच्छीमारी करता येणार आहे. त्यामुळे आता अचानक चप्पल मासळी मिळू लागल्याने या बंपर लॉटरीवर यापूर्वीच्या काळात मेटाकुटीला आलेल्या नाखवा आणि मच्छीमारांचे आर्थिक चक्र पावसाळ्यातील बंदी काळात मदतीसाठी गतिमान राहील असे दिसून येते.

एकदरा गावचे मच्छीमार नाखवा रोहन निशानदार यांनी बुधवारी सांगितले की, मुरूड आणि एकदरा येथील सुमारे 40 ते 50 मासेमारी नौकांना गेल्या 10 दिवसांत सुमारे 10 टन चप्पल मासळी मिळाली आहे. एका नौकेला चक्क 1900 किलो चप्पल मासळी मिळाली असून किलोचा भाव अंदाजे 280 रुपये मिळतो. हा एक मासा 1 किलोचा असतो. ही मासळी पीस फ्राय करून आधिक स्वादिष्ट लागते. येथील काही दालदी जाळीच्या नौकांना प्रत्येकी 5 ते 6 लाखांची चप्पल मासळी मिळाल्याची माहिती एकदरा येथील मच्छीमार नाखवा रोहन निशानदार यांनी दिली. राजपुरी, दिघी, कुडगाव, तुरंबाडी, हरवीत, मेदडी, रहाटाड, वाशी,मजगाव बंदरकाठा आदी गावाजवळील समुद्रपट्ट्यात मात्र चप्पल मासळी मिळालेली नाही अशी माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार धनंजय गिदी यांनी दिली.

‘चप्पल’ नावाच्या या मासळीला 25-30 वर्षापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. किंबहुना आम्ही देखील या ’सी फूड’ कडे त्या काळात दुर्लक्ष केले होते. परंतु आता या मासळीला खूपच भाव आणि महत्व प्राप्त झाले असून या मासळीला बोली भाषेत ‘गोवा पापलेट’ या नावाने देखील ओळखले जाते, अशी माहिती पेण येथील सामाजिक कार्यकर्ते विलास कोळी यांनी बोलताना दिली. शासनाने कोळी बांधवांच्या प्रलंबित समस्यांकडे गंभीरतेने पाहून समस्या सोडवायला पाहिजे अशी मागणी कोळी यांनी केली आहे. कोकणात समुद्रकिनारी मोठ्या संख्येने कोळी लोकवस्ती असून त्यांनी शासनाकडे आपल्या योग्य मागण्या मांडल्या आहेत असे कोळी यांनी स्पष्ट केले.
Exit mobile version