वाडीवस्तीवर शिक्षणाचा जागर

आदिवासी मुलांना शाळेत आणण्यासाठी अनोखी मोहीम

| पाली/बेनसे | वार्ताहर |

आदिवासी समाजातील म्हणजेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी सुधागड तालुक्यातील आश्रमशाळा पडसरेतर्फे अनोखा उपक्रम राबविला जात आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सुधागडसह पेण, रोहा, खालापूर, कर्जत व अलिबाग आदि तालुक्यातील वाड्या वस्त्या पिंजून काढत आहेत. एकेक विद्यार्थी व त्याच्या पालकांना भेटून शिक्षणाचे महत्व पटविले जात आहे. तसेच प्रवेशपात्र मुलांना मोफत प्रवेश दिला जात आहे.

पडसरे आश्रम शाळेतील शिक्षक राजू मोरे यांनी सांगितले की आदिवासी समाजातील मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावीत, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, सर्व सोयी सुविधांनी युक्त शाळेत ज्ञानकण गिरवावे, त्यांच्या पालकांनाही शिक्षणाचे महत्व कळावे आणि लग्न, स्थलांतर आदी कारणांमुळे या मुलांचे शिक्षण सुटू नये यासाठी ही मोहीम राबविली जाते. कोणतीही सुट्टी न घेता उन्हातान्हाची व दुर्गम भागाची पर्वा न करता वाडीवस्तीवर जाऊन गृहभेटी केल्या जातात, आणि मुलांचा प्रवेश निश्‍चित केला जातो. अतिशय तळमळीने हे काम सुरू असून कार्यक्षेत्रातील एकही मुल प्रवेशापासून वंचित राहणार याची काळजी घेतली जात आहे.



संस्था अध्यक्ष रविंद्र लिमये व शाळा स्तरावर मुख्याध्यापक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. पडसरे आश्रमशाळा ही सर्व सोई सुविधांनीयुक्त आयएसओ मानांकित आहे. सद्यस्थितीत येथे सुधागड, पेण, खालापूर, रोहा व अलिबाग या पाच तालुक्यातील एकूण 52 आदिवासी वाड्या पाड्यांतील पहिली ते 10 वी पर्यंत 448 विद्यार्थी मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

पथक तैनात
वाडीवस्त्यांपर्यंत जाण्यासाठी शिक्षक, अधीक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची चार पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकाला एक पथक प्रमुख नेमून दोन टप्यात हि प्रवेश भरती प्रक्रिया पुर्ण करायची आहे. पहिला टप्पा हा बुधवार (ता 26) ते शनिवार (ता.29) असा असून दुसरा टप्पा मंगळवार (ता.2) ते गुरुवार (ता.4) मे 2023 असा असणार आहे.

लग्नसोहळ्यात जागर
सध्या ठिकठिकाणी लग्नसराई सुरू आहे. अशा ठिकाणी देखील भेट देऊन उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जात आहे. याशिवाय पूजा किंवा इतर कार्यक्रम, बस स्थानक आदी मिळेल त्या ठिकाणी शिक्षणाबाबत जनजागृती करून मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले जात आहे.

अध्ययन पूर्ण होण्यासाठी
प्रत्यक्ष गृहभेटी देण्या मागचा अजून एक उद्देश असा आहे कि पालकांकडे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढलेले असून ही पालक लवकर शाळेत प्रवेश घेत नाहीत. शिक्षणाचा हक्क 2009 नुसार ऑनलाईन नोंदणी करताना प्रत्यक्ष आधार कार्ड वरील जन्मतारखेनुसारच त्या मुलाची इयत्ता ग्राह्य धरली जाते. परिणामी पालकांच्या अज्ञानामुळे उशिरा प्रवेश घेतल्याने तो विद्यार्थी वयानुरुप पुढील इयत्तेत प्रवेशास पात्र ठरतो आणि मागील इयत्तेतील त्याची पाटी कोरी राहते.

Exit mobile version