| खांब | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हाभरातील बलाढ्य संघांच्या सहभागात झालेल्या या स्पर्धेत संघाने सुरुवातीपासूनच जिद्द, शिस्त व लढाऊ खेळ सादर करत अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवला. या विजयाने क्रीडा प्रकारात रोह्याचा मान अधिक उंचावला असल्याची प्रतिक्रिया क्रीडाप्रेमी नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
स्पर्धेतील विविध फेऱ्यांमध्ये जय बजरंग रोहा संघाने प्रभावी बचाव आणि अचूक चढाया करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. निर्णायक सामन्यांत खेळाडूंनी संयम राखत उत्तम समन्वय दाखवला व रोहा तालुक्याचे नाव जिल्ह्यात उंचावले. या यशामध्ये जय बजरंग रोहाचा अष्टपैलू खेळाडू राकेश गायकवाड व राज मोरे यांच्या सर्वोत्कृष्ट खेळाचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या प्रभावी खेळामुळे संघाला महत्त्वाच्या क्षणी आघाडी मिळाली. प्रशिक्षक अमर सलागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडूंनी संघभावना जपत शिस्तबद्ध खेळ करत उत्कृष्ट कामगिरी केली. रोहा तालुका कबड्डी इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने या स्तरावर पोहोचून पदक जिंकण्याचा मान मिळवला असून ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकारी व समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







