। खांब । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील झिराड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रोह्यातील नामवंत जय बजरंग रोहा कबड्डी संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करून विजेतेपद पटकावून चषकावर आपले नाव कोरले.
झिराडच्या साई क्रीडा मंडळाच्यावतीने नुकतीच रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील 32 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. भव्यदिव्य अशा या कबड्डी स्पर्धेत रोहा तालुक्यातील जय बजरंग रोहा या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. त्यांना रोख रक्कम 1 लाख 25 हजार रु. व आकर्षक चषक असे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच, संघातील अष्टपैलू खेळाडू राकेश गायकवाड याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत संघातील सर्व खेळाडूंनी चांगला खेळ करून सांघिक रित्या हा विजय मिळवला. संघ मालक तथा मार्गदर्शक अमर सलागरे यांनी या विजयाबद्दल संघाचे अभिनंदन केले.