जय भवानी,जय शिवाजीचा उद्या रायगडावर जयघोष

शिवराज्याभिषेक दिनाची जोरदार तयारी
| किल्ले रायगड | प्रतिनिधी |

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी आयोजकांमार्फत सुरु आहे.राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो शिवभक्त रविवारपासून किल्ल्यावर दाखल होत असून,जय भवानी,जय शिवाजीच्या जयघोषांनी अवघा रायगड दुमदुमून गेला आहे.शिवाय सर्व वास्तू आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेल्या आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 ला दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या सुवर्ण दिनाची स्मृती कायम राहावी, या उद्देशाने अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहाने साजरा होत आहे. रायगडावर 5 जूनला रायगड विकास प्राधिकरणातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी उपस्थित शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तीने मोहिमेत सहभाग नोंदवला.


सोमवारी 6 जूनला सकाळी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. सकाळी 9.30 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसरदरेवर आगमन होईल. शिवरायांच्या उत्सवमूर्तीचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते विधिवत पूजन, अभिषेक व त्यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णाभिषेक केला जाईल. या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवभक्तांसाठी अन्नछत्र
गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , याच बरोबर निवार्याची व्यवस्था करण्यासाठी समितीचे पदाधिकारी आहोरात्र झटत आहेत. येणाऱ्या शिवभक्तांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी समिती कार्यरत आहे. गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा सुरु करण्यात आली आहे.

Exit mobile version