शिवशंकर, दसपटी, जयहिंद-धुळे, यांची विजयी सलामी
। पनवेल । वार्ताहर ।
शिवशंकर मंडळ, दसपटी मंडळ, जयहिंद मंडळ, विजय क्लब यांनी जय भवानी नव तरुण मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. धरणा कॅम्प, पोष्ट तळोजा, पनवेल येथे दि.22 एप्रिलपासून सुरू झालेल्या पुरुषांच्या अ गटात कल्याण-ठाणे येथील शिवशंकर मंडळाने दोन विजय मिळवीत बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला. पहिल्या सामन्यात शिवशंकरने मुंबई उपनगरच्या केदारनाथ मंडळाचा 44-14 असा पराभव केला. त्यानंतर झालेल्या सामन्यात नंदुरबारच्या एन. टी. पी. एस. चा 32-26 असा पाडाव करीत बाद फेरीच्या दृष्टीने आपली घोडदौड सुरू ठेवली. ब गटात चिपळूण-रत्नागिरीच्या दसपटी मंडळाने कल्याण-ठाण्याच्या ओम कबड्डी संघाला 34-31 असे नमवले. याच गटातील दुसर्या सामन्यात उपनगरच्या जॉली स्पोर्टसने मुंबईच्या गुड-मॉर्निंग स्पोर्ट्सचा 44-27 असा पराभव करीत आगेकूच केली. क गटात धुळ्याच्या जयहिंद मंडळाने पुण्याच्या बाबुराव चांदेरे फाउंडेशनवर 42-22 असा सहज विजय मिळविला. याच गटात स्थानिक रायगडच्या मिडलाईन स्पोर्टसने मुंबई शहरच्या बंड्या मारुती संघावर 30-26 अशी मात केली. ड गटात मुंबई शहरच्या विजय क्लबने रायगडच्या पांडवादेवी संघावर 28-23 असा विजय मिळविला. तर याच गटातील दुसर्या सामन्यात सांगलीच्या शिवाजी व्यायाम मंडळाने उपनगरच्या स्वस्तिक मंडळावर 30-26 अशी मात करीत आगेकूच केली.