आशीर्वाद क्रिकेट संघ अजिंक्य
| महाड | प्रतिनिधी |
खुटील हनुमान वाडी, होडबेकोंड येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त जय हनुमान प्रतिष्ठान क्रिकेट संघ यांच्या पुढाकाराने तसेच जय हनुमान मित्र मंडळ मुंबई, पुणे, ठाणे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ खुटील हनुमानवाडी, होडबेकोंड यांच्या सहकार्याने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान झालेले सर्व सामने अत्यंत रोमहर्षक ठरले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ करत अटीतटीच्या अंतिम सामन्यात सोनघर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. आशीर्वाद संघाने निर्धारित षटकात विकेट न गमावता 29 धावा करून विजयासाठी 30 धावांचे लक्ष सोनघर संघा समोर ठेवले. विजयासाठी धावांचा पाठलाग करताना सोनघर संघाने 2 षटकात 1 बळी गमावून केवळ 29 धावांपर्यंत मजल मारता आली. केवळ 1 धावेने आशीर्वाद संघाला विजयी घोषित करण्यात आले.
आशीर्वाद क्रिकेट संघ लोअर तुडील या संघाने विजेतेपद पटकावले, तर हनुमान स्पोर्ट्स क्लब सोनघर हा संघ उपविजेता ठरला. तसेच दत्तकृपा क्रिकेट संघ अप्पर तुडील यांनी तृतीय क्रमांकांवर नाव कोरले. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब ऋषी भावेने पटकावला तर उत्कृष्ट गोलंदाज साहिल नाकते ठरला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निलेश होडबे आणि मालिकावीर दिपेश बैकर यांनी किताब पटकवला.या क्रिकेट स्पर्धेचे समालोचक दत्तात्रय क्षीरसागर, श्रवन खोपकर यांनी करून खेळाडूंना प्रोत्साहीत केले.






