सह्याद्रीवाडीकरांची पाण्यासाठी दहा किलोमीटरची पायपीट
| महाड | उदय सावंत |
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सह्याद्रीवाडी गावात पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेली नळपाणीपुरवठा योजना निधीअभावी अपूर्ण राहिल्याने गावातील सुमारे 45 कुटुंबांतील 200 ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे महिलांना दिवसातून दोन वेळा पाण्यासाठी जंगलातून ये-जा करावी लागत असल्याने त्यांची मोठी परवड होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनांच्या घोषणा होत असताना दुर्गम भागातील नागरिकांना मात्र आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.
महाड तालुक्यातील आंबे शिवथर ग्रामपंचायत हद्दीत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सह्याद्रीवाडी हे दुर्गम गाव वसले आहे. दरडग्रस्त गावांच्या यादीत समावेश असलेल्या या गावात दरवर्षी तीन ते चार हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, ग्रामस्थांना काट्याकुट्यातून आणि घनदाट जंगलातून सुमारे दहा किलोमीटर अंतर पार करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांना दररोज दोन वेळा ये-जा करावी लागत असल्याने त्यांचा दिवसातील मोठा वेळ पाणी भरण्यातच जात आहे.
गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी राज्य शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र नाशिक येथील संबंधित ठेकेदाराने निधीअभावी काम अपूर्ण सोडल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, योजनेचे काम रखडले असून गावकऱ्यांना अद्याप नळाद्वारे पाणी मिळू शकलेले नाही. याबाबत महाड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता जगदीश फुलपगारे यांनीही निधीअभावी योजनेचे काम रखडल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाकडून नदीवर बंधारे बांधण्याची योजनाही हाती घेण्यात आली आहे. मात्र पावसाने सप्टेंबर महिन्यातच ओढ दिल्यानंतर अशा उपाययोजनांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी झाली असती, तर आज ग्रामस्थांवर पाण्यासाठी जंगलातून भटकंती करण्याची वेळ आली नसती, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रशासन ठोस पावले उचलणार कधी?
शासनाच्या जलजीवन मिशनचे उद्दिष्ट प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे असताना सह्याद्रीवाडीतील ग्रामस्थांना मात्र आजही पाण्यासाठी किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. निधीअभावी रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सह्याद्रीवाडीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन आणि शासन कधी ठोस पावले उचलणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.







