पावणे पाच लाख कुटुंबांना नळ कनेक्शन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील 5 लाख 48 हजार 620 कुटुंबांपैकी 4 लाख 71 हजार 826 कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असून, या कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे, उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील 100 टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसर्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 86 टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत.
तालुका | कुटुंबे | नळ कनेक्शन दिलेली कुटुंबे | टक्के |
अलिबाग | 71 हजार 364 | 56 हजार 132 | 78.67 |
कर्जत | 54 हजार 509 | 41 हजार 799 | 76.68 |
खालापूर | 36 हजार 47 | 36 हजार 47 | 100 |
महाड | 42 हजार 499 | 36 हजार 941 | 86.92 |
म्हसळा | 14 हजार 565 | 14 हजार 565 | 100 |
मुरुड | 16 हजार 423 | 15 हजार 265 | 92.95 |
पनवेल | 81 हजार 830 | 72 हजार 605 | 88.73 |
पेण | 45 हजार 67 | 29 हजार 195 | 64.78 |
पोलादपूर | 16 हजार 503 | 16 हजार 503 | 80.57 |
सुधागड | 15 हजार 865 | 12 हजार 445 | 78.44 |
तळा | 11 हजार 491 | 10 हजार 396 | 90.47 |
उरण | 36 हजार 300 | 36 हजार 300 | 100 |
रोहा | 42 हजार 670 | 37 हजार 191 | 87.16 |
माणगाव | 42 हजार 104 | 39 हजार 810 | 94.55 |
श्रीवर्धन | 21 हजार 383 | 19 हजार 838 | 92.77 |