दुष्मीमध्ये जलजीवन पाणी योजना नडली

| पेण | प्रतिनिधी |

दुष्मी ग्रामपंचायतीवर सत्तापरिवर्तन होईल याची बीजे जलजीवन पाणी योजनेमध्ये चालढकलपणा झाली तेव्हाच रोवली होती. कारण, बऱ्याच वेळी राजकीय पुढाऱ्यांना असे वाटते की, राव करील ते गाव करील का? परंतु, त्यांना विसर पडलेला असतो, जे गाव करील, ते राव करू शकत नाही.

पेण तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून दुष्मी ग्रामपंचायतीला संबोधले जायचे. तालुक्यातील निम्म्याहून जास्त निधी राष्ट्रवादीचे पुढारी दुष्मी ग्रामपंचायतीला देत होते. खासदार, मंत्री, आमदार छोट्यातील छोट्या कार्यक्रमासाठी दुष्मी ग्रामपंचायतीमध्ये येत होते. कारण, पेण तालुक्यात राष्ट्रवादीची टिक-टिक ही दुष्मी ग्रामपंचायतीमुळे सुरू होती. मात्र, यावेळी मतदारराजांनी पक्का बेत आखून निर्णय घेतला. विकास नाही, मत नाही. यामध्ये आदिवासी वाड्या-वस्त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या पुढाकाराचा फटका तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांना बसला. त्यांना सरपंचाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले.

आदिवासीवाड्यांवर जलजीवन पाणी योजनेचे पाणी न पोहोचल्याने आदिवासी मतदारराजा नाराज झालाच होता. त्यातच ज्या प्रमाणात विकास योजना आदिवासीवाड्यांवर व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नव्हत्या. त्यामुळेच आदिवासी बांधवांनी प्रस्तापितांना खुर्चीवरून दूर ठेवण्याचे ठरविले. कारण लोकशाहीत जात, धर्म, पंत गणला जात नाही. तर मतांची ताकद गणली जाते आणि ही मताची ताकद काय असते, हे दुष्मी ग्रामपंचायतीतील प्रस्तापितांना दाखवून दिले.

पत्रकारांचा आणि समाजसेवकांचा नाद करायचा नाही- संतोष ठाकूर
मी कोण्या एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलेला नाही. परंतु, आय.एस.ओ. प्रमाणित दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांच्या रस्ता आणि पाण्याच्या प्रश्नाला वाचा फोडल्याचा राग मनात धरुन सत्ताधारी सरपंच रश्मी भगत आणि राष्ट्रवादीचे पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत आणि त्यांच्या हस्तकांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करुन मी (संतोष ठाकूर) बोगस समाजसेवक, पत्रकार असल्याची बदनामी केली, तर दुष्मी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांच्यावर दबाव टाकून त्यांना कामावरुन कमी करण्यास भाग पाडल्याने अखेर नाईलाजास्तव ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरुन चोख उत्तर दिले.
Exit mobile version