। गडब । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जांभळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पेण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला केला आहे.
यावेळी जांभळे म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून विद्यमान आमदार रवीशेठ पाटील यांना विजयी केले होते. परंतु, गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केले. अतुल म्हात्रे यांना राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस यांचा पाठिंबा आहे. तसेच, त्यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. यामुळे तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत असून प्रचारात त्यांच्यासोबत राहून त्यांना विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचेदेखील संजय जांभळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रसाद भोईर यांनी उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. यामुळे शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांच्या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो. अतुल म्हात्रे हे लंडनमध्ये उच्चशिक्षण घेऊन आले आहेत. एमएमआरडीए प्रकल्पाबाबत त्यांचा सखोल अभ्यास आहे. बेरोजगारी, रोजगार याबाबत त्यांचे व्हिजन चांगले आहे. यामुळेच या तरुण उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.