जांभुळपाडा ते कावाडे एमआयडीसीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
एकीकडे मुसळधार पावसाने धरणे तुडुंब भरली आहेत, तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील जांभुळपाडा ते कावाडे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. एमआयडीसीचा पाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून विस्कळीत झाल्याने सुमारे 12 हजार नागरिक ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करत असून, एमआयडीसीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अलिबाग तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद तसेच एमआयडीसीच्या अखत्यारितील धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, जांभुळपाडा, जलपाडा, पेढांबे, रांजणखार, शिरवली, हाशीवरे आणि कावाडे या गावांमध्ये एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा गेल्या 15 दिवसांपासून ठप्प असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
रेवस झोन-2 मधील पाणीटाकीत पुरेशा प्रमाणात पाणी भरले जात नसल्याने या गावांपर्यंत पाणीच पोहोचत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे विशेष हाल होत आहेत.
काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीने केलेल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानंतर ही समस्या अधिक तीव्र झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, अतिवृष्टीमुळे पाण्याच्या पातळीवर परिणाम झाल्याने पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे सांगण्यात आले. कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून आरसीएफलाही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
नियोजनावर प्रश्नचिन्ह!
धरणे भरलेली असतानाही नळ कोरडे राहणे ही यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. पंधरा दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसून, एमआयडीसीने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
