27 ठार, 10 गंभीर जखमी
| पुणे | वृत्तसंस्था |
जम्मू-कश्मीर येथील पहलगाम जिल्ह्यामध्ये आज मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पर्यटनाचा आनंद घेणार्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोर्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर पर्यटक फिरत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या अमानुष गोळीबारात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून, दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवरदेखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू असून, मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यातील पाच जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालू न फोटो काढत होतं. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून, या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे. या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटकदेखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत, अशी माहिती आहे. तसेच नवीन लग्न झालेल्या एका जोडप्यातील पुरुषालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या.