अवाजवी घरपट्टी वाढीविरोधात एलगार; प्रशासन, नगरसेवक अधिनियमांपुढे हतबल
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रशासनाने घरपट्टी वाढीसंदर्भात नोटीसा बजावल्या होत्या. तशाच यंदाही वाढीव अवाजवी घरपट्टी आकारणीसंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनतेमधून नाराजीचे सुर उमटत असून त्यांचा उद्रेक होण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, येथील नागरिकांनी शुक्रवारी (दि.14) घरपट्टीवाढीविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार केला असून, त्याबाबतचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
पोलादपूर तालुक्याच्या नगरपंचायतीने गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही पंचायत हद्दीतील नागरिकांना अवाजवी घरपट्टी आकारणी संदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमधून नाराजीचे सुर उमटत आहेत. या संदर्भात नागरिकांनी पोलादपूर बाजारपेठेतील गणेश मंदिरात तीन बैठका घेतल्या आणि शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा त्यांनी निर्धार केला. याबाबत त्यांनी बुधवारी (दि.13) नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांना निवेदन दिले आहे. यावेळी दर्पण दरेकर, संतोष मोरे, प्रदीप भूतकर, गणेश शेठ, शैलेश पालकर, राजाभाऊ दिक्षित, सुनील भिलारे, गिरीधर दरेकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना शुक्रवारच्या जनआक्रोश मोर्चाबाबत रूपरेषा सांगितली. तसेच, या निवेदनाच्या प्रती पोलादपूर तहसिल कार्यालय आणि पोलीस ठाण्यातही देण्यात आल्या आहेत.
त्यानंतर मुख्याधिकारी शिपाई यांनी केवळ दोनच तासांमध्ये निवेदन देणाऱ्या नागरिकांना चर्चेसाठी पाचारण करण्याचे पत्र पाठविले. त्यानुसार, नागरिक समस्या निवारण मंचातर्फे बुधवारी सायंकाळी प्रभारी नगराध्यक्ष प्रसाद इंगवले आणि विरोधीपक्षनेते दिलीप भागवत यांच्या उपस्थितीत नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी विनय शिपाई आणि घरपट्टी मुल्यांकन मोजणीच्या ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
याप्रसंगी नागरिक समस्या निवारण मंचातर्फे नगरसेवकांनी तात्काळ वसुलीला स्थगिती ठराव केल्यास नागरिकांना दिलासा मळेिल, असे सांगत सदोष मुल्यांकन रद्द करण्यासंदर्भात आग्रह धरण्यात आला. मात्र, नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवक अधिनियमांपुढे हतबल असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाने शुक्रवारी (दि.14) घरपट्टीवाढीविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. हा मोर्चा सकाळी 10 वाजता पोलादपूर शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहापासून काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, या मोर्चात महिला, पुरूष व तरूण मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन देखील नागरिक समस्या निवारण मंचातर्फे करण्यात आले आहे.







