सरकारविरोधात जन आक्रोश समिती आक्रमक
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मागील 16 वर्षांपासून सुरु आहे. या 16 वर्षांत राज्यातील सर्वच पक्षांनी सत्तेचा उपभोग घेतला. सत्तेचा उपभोग घेत असताना सर्वच राजकीय पक्षांनी या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन दिली. मात्र, दिलेली प्रत्येक डेडलाईन हुकली. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या शेकडो गावांना अक्षरशः यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.13) सायंकाळी आंबेवाडी नाका येथे जन आक्रोश समितीच्यावतीने मुंबई-गोवा महामार्गावर सरकारच्या डेडलाईनची होळी साजरी करण्यात आली. यावेळी होळीला साकडे घालत शासन प्रशासनाला सुबुद्धी देवो व महामार्ग चौपदरीकरणाचे काम व कोलाड येथील पुलाचे काम लवकरात लवकर होवो, अशी प्रार्थना करण्यात आली.
महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. वारंवार अपघात घडल्याने शेकडो मृत्यूमुखी पडले, तर हजारो जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत रोहा तालुक्यातील कोलाड हद्दीत रस्त्याचे व पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरु करण्यात आले आहे. सदर महामार्गाचे काम सुरु होत असताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राज्यात मागील 16 वर्षांत अनेक राजकीय पक्षांनी सत्तेचा उपभोग घेत असताना डेडलाईन दिल्या होत्या. मात्र, दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे संतप्त कोलाडवासियांनी सरकारच्या डेडलाईनचो होळी करण्यात आली. यावेळी येथे कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, विठ्ठल घोणे, संजय कुर्ते, महेंद्र वाचकवडे, संदीप माने, सुरेश शिंदे, बाळा शिंदे, लक्ष्मण जाधव, अविनाश म्हसकर सुतार उपस्थित होते.