| माणगाव | प्रतिनिधी |
लोणेरे येथील लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणी अद्यापही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.25) लोणेरे व गोरेगाव बंद ठेवत सर्व पक्षीयांकडून जन आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. या हत्याप्रकरणी आरोपीला दोन दिवसांत अटक करू, अशी ग्वाही रायगड पोलीस प्रशासनाने गोरेगाव येथे येऊन सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांना दिली आहे. त्यानंतर सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती अरुण चाळके व नरेश अहिरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरेगावातील जन आक्रोश मोर्चा तात्पुरता स्थगित
