। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील डिकसळजवळील पाळी गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीचे त्याच गावातील एका तरुणासोबत ओळखीतून गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर घरात वाद झाला. त्यानंतर मे 2026 पासून संबंधित मुलगी आरोपीच्या घरी राहत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुलगी दोन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वारोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काजरोळकर पुढील तपास करीत आहेत.







